Saturday, July 27, 2024
Homeनगरसंभाव्य टंचाई नियोजनार्थ पालकमंत्र्यांची उद्या बैठक

संभाव्य टंचाई नियोजनार्थ पालकमंत्र्यांची उद्या बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अर्ध्याहून अधिक पावसाळा संपत आला. जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. आतापर्यंत झालेला पाऊस असमाधानकारक असून पाण्याअभावी खरिप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. जनावरांचा चार्‍याचा प्रश्नसोबत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे. यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल, कृषी, पशूसंवर्धवन, पाटबंधारे विभागासह जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांची उद्या सोमवार (दि.28) नगरला बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईसह जनावरांचा चारा, चारा डेपो आणि धरणातील पाणी नियोजनावर चर्चा होवून निर्णय होणार आहे.

- Advertisement -

‘दक्षिणे’च्या मैदानात थोरात की गडाख ?

जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात ही बैठक होणार आहे. जिल्ह्यात सुमारे 25 दिवसांहून अधिक दिवसांचा पावसाचा खंड आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणी झालेली पिके आणि मागील शिल्लक असा सुमारे एक ते दीड महिना पुरेल ऐवढाचा चारा शिल्लक आहे. परतीचा पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील सुमारे 15 ते साडेपंधरा लाख जनावरांना काय द्यावे, असा प्रश्न पशूधन पालकांसमोर आहे. पाऊस नसल्याने मुळा आणि भंडारदरा धरणात असणार्‍या पाण्यातून नियोजन करून चारा उत्पादन करण्यासोबत मागणीनूसार चारा डेपो सुरू करण्याचे काम जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

कबुतर चोरीच्या संशयावरून मुलांना अमानुष मारहाण

यासाठी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आजची बैठक होणार असून या बैठकीत पुढील संभाव्य टंचाईवर निर्णय होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या बैठकीला पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुळा, कुकडी धरणाचे अधिकारी, साखर सहसंचालक, भुजल सर्वेक्षण विभाग, रोहयो, पशूसंवर्धन विभाग, दूग्ध विकास विभाग, महावितरण अशा जिल्ह्यातील 33 विभागाच्या अधिकारी यांच्यासह आमदार यांना बोलवण्यात आले आहे.

महसूल पथकाने वाळू उपशाचे 8 चप्पू केले नष्ट

लम्पीमुळे छावण्याचा विषय संपला

जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन चारा डेपो सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा लम्पीमुळे जनावरांच्या छावण्याचा विषय संपला असून यंदा पाऊस न झाल्यास जनावरांच्या छावण्या काढण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चारा उत्पादनासाठी गाळपेर क्षेत्राचा उपयोग

चारा उत्पादनासाठी अकोले, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील गाळपेर क्षेत्रावर चारा उत्पादन करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यात येत आहे. या ठिकाणी असणार्‍या गाळपेर भागात किती चारा तयार करता येवू शकतो, यासह ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी शेतकर्‍यांकडून चारा तयार करून तो शासनामार्फत विकत घेवून शेतकर्‍यांना पुरवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या