छत्रपती संभाजीनगर- गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आतापर्यंत दरवर्षी खुल्या प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात होती. आता ही संख्या वाढवून ४० करण्यात आली आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविकेसाठी ३० विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरेटसाठी १० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
राज्यातून दरवर्षी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र, बर्याचवेळा गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना खर्चाची तरतूद नसल्याने उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे कठीण होते. म्हणून शासनाने गुणवंत मुला-मुलींसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. दरवर्षी खुल्या प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्यात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शासनाने आता या संख्येत भरीव वाढ केली आहे.
आता पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर, पदविकासाठी ३० विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरेटसाठी १० जणांना अशी एकूण ४० जणांना शासनाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी ९ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र आणि विधि अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृती मिळेल. अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र यासाठी १२ जणांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर डॉक्टरेसाठी वरील सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक विद्यार्थी याप्रमाणे १० विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे.