अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या बस व वाहनांची सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने प्रत्येक शालेय वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते.
घार्गे यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांची ने-आण करताना कुठलीही तडजोड होऊ नये. वाहनांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत असणे केवळ गरजेचेच नाही, तर अनिवार्य आहे. तसेच सहा वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचारीची नियुक्ती देखील करण्यात यावी. बस किंवा वाहनांवर शाळेचा नाव, संपर्क क्रमांक व तातडीच्या दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहिलेले असावेत, अशीही सूचना देण्यात आली. यामुळे कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तात्काळ संपर्क साधता येऊ शकेल.
शाळेच्या परिसरातच विद्यार्थ्यांची चढ-उतार व्हावी यासाठी प्रत्येक शाळेने आपल्या बस पार्किंगची व्यवस्था योग्य रीतीने करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. रस्त्यांवर थांबून चढ-उतार केल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी शिस्तपालन करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक शाळेने एक जबाबदार समन्वय अधिकारी नियुक्त करावा, जो वाहनांच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवेल. तसेच सर्व शाळांनी नियमितपणे शालेय परिवहन समितीच्या बैठकांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.
अवैध वाहतूक रोखण्यासाठी संयुक्त मोहीम
अवैध शालेय वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांकडे लक्ष वेधत, घार्गे यांनी संबंधित यंत्रणांना संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. परवाना नसलेली किंवा अधिक क्षमतेपेक्षा भरलेली वाहने, सुरक्षेची अयोग्य साधने याविरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला.





