अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शाळा स्तरावर असणार्या विविध 15 समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा पातळीवर असणार्या काही समित्यांच्या कामकाज व शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यामुळे या समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यामुळे आता मुख्याध्यापक व शिक्षक यांना अध्ययन, अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होणार आहे.
शासनाने शाळास्तरावरील 15 विविध समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकत्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविनिमय करून याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रारूप तयार करण्यात आले होते. हे प्रारूप शासनास सादर करण्यात आले. त्यानुसार शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
यापुढे शाळा व्यवस्थापन समिती, माता- पालक संघ, पालक-शिक्षक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू संनियंत्रण समिती, एसक्यूएएएफ स्वयंमूल्यांक समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या 15 समित्याचे शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती/अंतर्गत तक्रार समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा केवळ चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत.
शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयाचे शासन पातळीवरुन स्वागतार्ह करण्यात आले. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या विविध बैठका घेण्यात जाणारा वेळ वाचणार असून यामुळे अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. शासन जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने घेत असलेले निर्णय सकारात्मक असून शिक्षकांची अवांतर कामे कमी करण्यासाठी संघटना शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याचे शिक्षक संघटनाच्यावतीने सांगण्यात आले.