Sunday, May 3, 2026
HomeनगरSangamner : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे - ना. भुसे

Sangamner : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे – ना. भुसे

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून (दि.10) टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एका विशेष ध्वनीचित्रफितीद्वारे संवाद साधला आहे. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यात 10 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वीच्या आणि 20 फेब्रुवारीपासून इयत्ता 10 वीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर बोलताना शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना भावनिक साद घालताना ते म्हणाले, जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका लिहायला बसता, तेव्हा तुमच्या हातात केवळ कागद नसतो, तर त्यामध्ये तुमच्या आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने दडलेली असतात. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले आहेत. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. परीक्षेच्या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सकारात्मक विचार करावा, पुरेशी झोप घ्यावी आणि सकस आहार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मन शांत ठेवून आणि हसतमुख राहून पेपर लिहिल्यास परीक्षेचा ताण जाणवणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

परीक्षेच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे आवाहन केले. तुम्ही या देशाचे भविष्य आहात आणि तुमचा प्रामाणिकपणा हीच तुमची खरी ओळख आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. शेवटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण राज्य शासनाच्यावतीने त्यांनी सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. आपल्या कष्टाच्या जोरावर विद्यार्थी राज्याचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...