Sunday, April 6, 2025
Homeनगरशाळांचे होणार जिओ टँगिंग; प्री स्कूल नोंदणीचे अ‍ॅप तयार

शाळांचे होणार जिओ टँगिंग; प्री स्कूल नोंदणीचे अ‍ॅप तयार

पुणे/अहिल्यानगर |प्रतिनिधी| Pune | Ahilyanagar

राज्यातील सर्व शाळांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरद्वारे (एमआरएसएसी) हे काम करण्यात येणार असून त्यासाठी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, नगरसह राज्यातील प्री स्कूलच्या नोंदणीसाठी अ‍ॅप विकासीत करण्यात आले असून लवकरच मुंबईत त्याचे लोकार्पण होणार आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी सध्या नोंदणी नसणार्‍या राज्यातील सर्व प्री स्कूलची एकाच ठिकाणी नोंदणी करून ते शालेय शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने प्री स्कूलच्या नोंदणीसाठी अ‍ॅप विकासीत केले आहे. हे अ‍ॅप तयार झाले असून यात प्रत्येक प्री स्कूलमध्ये भरती होणारे विद्यार्थी, त्यांचे वर्गा संबंधीत प्री स्कूलकडे असणार्‍या भौतिक सुविधांसह अन्य माहिती भरावी लागणार आहे. यामुळे राज्यात किती प्री स्कूल असून त्यात किती विद्यार्थी आहेत, याची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत अशा प्री स्कूलबाबत कोणताच डेटा शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही.

यासह राज्यातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या यूडायस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात शाळा, विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा यांबाबत माहितीचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग आणि वापर शासन स्तरावर विविध धोरणे, कार्यक्रमांची आखणी, तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो. मात्र, गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नाही. त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी एमआरएसएसीसोबत करारनामा करण्यात आला आहे.

त्यामुळे एमआरएसएसीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती, यूडायस प्लस या संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून माहिती एका स्वतंत्र डॅश बोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी होणार आहे. एमआरएसएसीद्वारे राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग अक्षांश व रेखांशांसह करण्याची प्रक्रिया मोबाइल पद्वारे करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील विविध विभागांमार्फत कार्यरत सर्व शाळा, तसेच अंगणवाड्यांबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

दोन शाळांतील अंतर होणार स्पष्ट
शाळांच जीओ टॅगिंग झाल्यावर राज्यातील अंगणवाड्याचे देखील करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. शाळांचे जीओ टँगिंगमुळे दोन शाळांमधील अंतर, पालकांना त्यांच्या घरापासून कोणती शाळाजवळ आहे. त्या ठिकाणी किती विद्यार्थी क्षमता असून रिक्त आणि भरलेल्या जागांचा माहिती उपलब्ध होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : मंगलमय वातावरणात साईनगरीत श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवास शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साई नामाने साईनगरी दुमदुमून गेली...