Sunday, September 8, 2024
Homeनाशिकशाळा अनुदान निकष शिथिल करणार : आ. दराडे

शाळा अनुदान निकष शिथिल करणार : आ. दराडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शाळा अनुदान टप्प्यांचे असलेले निकष शिथिल करण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली असल्याची माहिती नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी दिली.

- Advertisement -

राज्यातील पात्र-अपात्र शाळा, प्रलंबित संच मान्यता, शिक्षक भरती, आवक व जावक मिळत नसलेल्या शाळांचे अनुदान टप्पा देण्याबाबत व त्याचे निकष याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार किशोर दराडे यांनी शिष्टमंडळासह शिक्षणमंत्री केसरकर यांच्या दालानत भेट घेऊन शिक्षण, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. बैठकीस शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण सचिव रणजितसिंह देवल यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शाळा पात्र-अपात्रकरता असलेल्या 11 निकषांपैकी सहा निकष पूर्ण केलेले असले तरी मान्यता देण्यात यावी, अशी मागणी दराडे यांनी केली. निकष पूर्ण करताना येणार्‍या अडचणीही दराडे यांनी यावेळी निर्देशनास आणून दिल्या. 20 टक्क्यांहून 40 टक्के तर 40 टक्क्यांहून 60 टक्के शाळा अनुदानित करताना शिक्षण विभागाकडून पडताळणी केली जात आहे.

यासाठी अनेक निकष लावले जात आहेत. वास्तविक 20 टक्के असो की 40 टक्के अनुदान देताना शाळांची पडताळणी झाली असून शाळांनी निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे यातील निकष शिथिल करण्यात यावे, अशी आग्रही मागणी दराडे यांनी केली. शिक्षक भरतीस विलंब होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यावर शिक्षणमंत्री केसरकर यांनी अनुदानातील निकष शिथिल करण्याबाबत योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल, असे आश्वासन दिले. शिक्षकांचे वेळेत वेतन होत नसल्याची तक्रार दराडे यांनी यावेळी केली. त्याबाबत शिक्षण विभागास तत्काळ लक्ष घालण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या