Saturday, October 5, 2024
Homeनगरशालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)

गरज नसलेला नवीन मेनू बंद करावा, मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने एक दिवस खिचडी बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

- Advertisement -

केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळा येथील इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण योजना चालविली जाते. या योजनेत काम करणारे कर्मचारी हे अतिशय कमी मानधनावर काम करत आहे.

त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काल, शुक्रवारी महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

नवीन मेनुला विरोध करत मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्हाभरात खिचडी बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, जिल्हाध्यक्षा सविता विधाते, सुभाष सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विद्या अभंग, जिल्हा कोषाध्यक्ष मेजबीन सय्यद, राज्य समन्वयक शितल दळवी, उत्तम गायकवाड, कैलास पवार आदीसह मोठ्या संख्येने शाळेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा फक्त 2500 रूपये इतके तुटपुंजे मानधन मिळते व एक हजार रूपये मानधन वाढवले आहे; पण त्याचाही जीआर शासनाने अद्याप दिलेला नाही. या उलट कामाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढवलेला असुन यामध्ये शालेय परिसर, वर्ग आणि स्वच्छता गृह साफसफाई करण्यासाठी दबाव आणला जात असून नव्याने सुरू करण्यात आलेला मेनू कसा शिजवून घ्यायचा हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्याशिवाय आता तीन प्रकारचा आहार शिजवावा लागत आहे. दोन आठवड्याचे आहार नियोजन असून तो आहार कसा करावा असा प्रश्‍न कर्मचार्‍यांसह शिक्षकांना सुध्दा पडलेला आहे. या पध्दतीचा विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने खिचडी बंद आंदोलन करण्यात आले. व नवीन मेनू मध्ये लक्ष घालून तत्काळ हा मेनू बंद करून पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या