Saturday, July 27, 2024
Homeक्रीडा...आणि सचिन मारतोय स्ट्रेट सिक्स!

…आणि सचिन मारतोय स्ट्रेट सिक्स!

नगरचे हरहुन्नरी चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे दोन वीकपॉईंट…किशोरकुमार व सचिन तेंडूलकर. किशोरदाची गाणी ऐकत चित्रे वा शिल्पे रेखाटण्यात ते नेहमी मग्न असतात. तर, सचिन ऐन भरात असताना त्याच्या फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी बाकी सारे काम बाजूला ठेवण्याचा कांबळेंचा शिरस्ता. दुसरीकडे सचिनने वन-डेमध्ये पहिले द्विशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकल्यावर त्या आनंदात कांबळेंनी त्याचे स्ट्रेट ड्राईव्हची नजाकत दाखवणारे माती शिल्प साकारले होते. दुर्दैवाने त्यांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत हे शिल्पही भस्मसात झाले. पण, त्यामुळे ते खचले नाही तर सचिनची अनेक चित्रे व शिल्पे साकारून त्याला त्यांनी भेटही पाठवली. याच सचिन प्रेमाच्या मालिकेत आता कांबळेंनी सचिनचे अनोखे शिल्प केले असून, ते आता वानखेडे स्टेडीयमवर दिमाखात झळकणार आहे.

आपल्या कारकीर्दीत चौकार व षटकारांची आतषबाजी करणार्‍या सचिनची षटकार मारतानाची गाजलेली एक पोझ यापुढे कायमस्वरूपी वानखेडे स्टेडिअममध्ये शिल्पकृतीच्या रुपाने पाहायला मिळणार आहे. नगरच्या प्रमोद कांबळे यांनी ही 22 फुटी कलाकृती साकारली. सचिनच्या या शिल्पासाठी जी पोझ निवडण्यात आली ती, ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न याच्या चेंडूवर त्याच्या डोक्यावरून सरळ रेषेत उंचावून सीमारेषेवरील साईड स्क्रीनवर षटकार मारतेवेळीची असल्याचे सांगण्यात येते. क्रिकेटचा देव, भारतरत्न व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे हे पूर्णाकृती शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात आले असून उद्या (बुधवारी) एक नोव्हेंबरला त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

- Advertisement -

सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिनचे शिल्प वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्याची घोषणा केली होती. जगातील अनेक देशांमध्ये तेथील प्रसिद्ध खेळाडूंचे पुतळे आहेत. आता भारतातही असे शिल्प साकारले आहे. कांस्य धातूपासून (ब्राँझ) तयार करण्यात आलेल्या या मुख्य शिल्पाची उंची 10 फूट व हातातील बॅट 4 फूट असे चौदा फूट उंचीचे मूळ शिल्प आहे. त्याखाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. सचिन रमेश तेंडूलकर असे पूर्ण नाव त्यावर कोरण्यात आले आहे. चेंडूच्या पॅनेलवर सचिनचे विविध विक्रम लिहिण्यात आले आहेत. एकूण 22 फूट उंचीचे हे शिल्प झाले आहे. स्टेडिअममधील प्रेक्षागृहात हे शिल्प बसविण्यात येत असल्याने ते सतत सर्वांच्या नजरेस पडणार आहे.

या शिल्पाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सांगितले की, हे काम मला मिळाले, तेच मुळी स्वप्नवत आहे. एका बाजूला माझ्याकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील शिल्पाकृतींचे काम सुरू होते, तर दुसरीकडे क्रिकेटच्या देवाचे काम हाती आले होते. सचिनशी माझे 2012 पासून संबंध आहेत. यानिमित्ताने त्याच्याशी पुन्हा भेटीचा योग आला. त्याचे बंधू अजित तेंडूलकर यांची सचिनच्या मूर्तीतील (शिल्पातील) बारकावे साकारण्यासाठी मदत झाली. नगरच्या स्टुडिओमध्ये सुमारे आठ महिने हे काम सुरू होते. अजित तेंडूलकर हे काम पाहण्यासाठी नगरला आले होते. शिल्प तयार करण्यापूर्वी ते कसे असावे, विशेष म्हणजे यासाठी कोणती पोझ घ्यावी, यावर बरीच चर्चा झाली. यासाठी जुनी छायाचित्रे पाहण्यात आली. त्यातील षटकार मारतानाची एक पोझ निश्चित झाली. उत्तुंग षटकार मारण्याचा तो क्षण सचिनची उत्तुंग कामगिरी सांगण्यासाठी पुरेसा बोलका आहे. 1998-99 मध्ये शारजा येथे झालेल्या सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली होती. त्यात शेन वॉर्न याच्या चेंडूवरही षटकार मारले होते. त्यापैकीच हा एक क्षण आहे. शिल्प साकारताना सचिनची हवेत असलेल्या चेेंडूवरील नजर, हेल्मेटवरील लोगो यासह सर्व बारकाव्यांवर खूप मेहनत घेतली गेली आहे. यासाठीही अजित तेंडूलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. काम सुरेख व्हावे, यासाठी विशिष्ट माती (क्ले) आणि काही साहित्य जपानहून मागविण्यात आले, असेही कांबळे यांनी सांगितले.
सचिन तेंडूलकरच्या शिल्पाच्या माध्यमातून प्रमोद कांबळे यांच्या लौकिकात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. याआधी त्यांनी मध्यप्रदेशातील चित्रकुटमध्ये नानाजी देशमुखांनी साकारलेल्या उद्यानात केलेल्या प्राण्यांच्या शिल्पकृतींची तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रशंसा केली होती व आता वानखेडे स्टेडीयमवरील सचिनचे स्ट्रेट सिक्स मारतानाचे शिल्प देशविदेशातील खेळाडू व क्रिकेट रसिक पाहतील तेव्हा त्यांना प्रमोद कांबळे यांच्या बोटातील जादूंचे दर्शन होईल…तो क्षण नगरकरांसाठीही अभिमानाचा असेल.

शिल्पकृतीने सन्मान
 

आजवर अनेक कलाकृती साकारल्या. मात्र सचिनचा पुतळा साकारणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. वानखेडे स्टेडियमसारख्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणारे भारतरत्न व्यक्तीचे शिल्प साकारण्याची संधी नगरमधील माझ्यासारख्या कलाकाराला मिळाली, ही माझ्यासाठी सन्मानाचीच गोष्ट आहे, अशी भावना प्रमोद कांबळे यांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या