अकोले / संगमनेर |प्रतिनिधी| Akole| Sangamner
तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या तरुणांना वाचविण्यासाठी शोध घेत असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून सहाजण बुडाले. यात पीएसआयसह दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले. अन्य दोन जवान बचावले आहेत. बुधवारपासून येथे झालेल्या घटनेत एकूण चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या अन्य दोन तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही वार्ता राज्यात पसरताच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
बुधवारी दुपारी सुगाव बुद्रुक येथील प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय 25, रा. धूळवड, ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता, पण बुधवारी रात्रीपर्यंत त्याला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार या दलाचे पथक तीन गाड्यांमधून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळीच शोधकार्यास सुरुवात केली. दोन बोटींमधून ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक बोटीत पाच जवान होते तर एका बोटीत गणेश मधुकर देशमुख (वय 37, रा. सुगाव बुद्रुक) या स्थानिक युवकाला घटनेचे निश्चित ठिकाण दर्शवण्यासाठी बरोबर घेण्यात आले होते.
दोन पैकी एक बोट बुधवारी दोन युवक जेथे बुडाले त्या जागेकडे जात असताना तेथे असलेल्या मोठ्या भोवर्यात अडकली. नदीपात्रात असलेल्या दगडी बंधार्यामुळे त्याठिकाणी एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे व पाण्याचा वेगही तेथे प्रचंड आहे. भोवर्यात अडकलेली बोट गरगर फिरली आणि पलटी खाऊन बुडाली. बोटीवरील सर्वजण पाण्यात फेकले गेले. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे त्यांना बाहेर पडण्यास अडथळे निर्माण होत होते. ही घटना घडताच दुसरी बोट तत्काळ मदतीसाठी धावली. त्यामुळे दोन जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र अन्य तिघांचे प्राण ते वाचू शकल नाही. या तिघांचेही मृतदेह मात्र सापडले. या बोटीवरील स्थानिक युवक गणेश देशमुख याचा मात्र शोध लागू शकला नाही.
या घटनेत पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, चालक वैभव सुनील वाघ व जवान राहुल गोपीचंद पावरा हे शहीद झाले. तर जवान पंकज पंढरीनाथ पवार व अशोक हिम्मतराव पवार या दोघा वाचलेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. बुधवारी बुडालेला अर्जुन जेडगुले आणि गुरुवारी बुडालेला स्थानिक युवक गणेश देशमुख या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड, उत्कर्षा रूपवते आदिंनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी स्वतः घटनास्थळी येऊन आढावा घेतला. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे विशेष पोलिस महानिरीक चिरंजीव प्रसाद यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, अकोलेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, संगमनेर शहराचे भगवान मथुरे, संगमनेर तालुक्याचे देवीदास ढुमणे, आश्वीचे संजय सोनवणे, घारगावचे संतोष खेडकर यांसह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अकोले दुर्घटनेत शहीद झालेले पीएसआय प्रकाश शिंदे हे दौंड तालुक्यातील कौठडी गावचे. प्रकाश हे सामान्य कुटुंबातील लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. त्यामुळे प्रकाश यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. घरात कुणीही उच्च शिक्षित नसताना प्रकाश यांनी मात्र शिक्षणाचा ध्यास घेतला. आई अन् भावडांची साथ, मेहनतीची तयारी, प्रबळ इच्छाशक्ती या जोरावर प्रकाश यांनी पोलीस खात्यात रुजू होण्याचं स्वप्न पाहिलं. आधी पोलीस शिपाई म्हणून ते पोलीस खात्यात जॉईन झाले. मात्र एवढ्यावरच न थांबता अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. 2023 ला ते एमपीएससी परीक्षा पास झाले. पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली. 26/11 हल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वन दलामध्ये कमांडो म्हणून त्यांनी काम केलं आहे.
पालकमंत्र्यांचा ताफा अडवला..
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे घटनास्थळी आले तेव्हा त्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यांचा ताफा अडवत लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आठ जण बुडाले तरी पाणी बंद का केले नाही?, अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल त्यांना विचारण्यात आला. बचावकार्य धिम्या गतीने सुरू असल्याची तक्रार करण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका ही वेळेवर उपलब्ध झाली नाही, रुग्णवाहिका वेळेत मिळाली असती तर दोन जणांचे प्राण वाचले असते असेही त्यांना सुनावण्यात आले.
शहीद जवानांना दिली मानवंदना..
राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, चालक वैभव सुनील वाघ व जवान राहुल गोपीचंद पावरा यांना सुगाव फाटा येथील लॉन्स येथे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथकातील एका जवानाचा अश्रूंचा बांध फुटताच उपस्थित सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यानंतर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले.