अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पीक नुकसानीच्या भरपाईसाठी यापूर्वी लागू असलेल्या दुष्काळाच्या ट्रिगर दोन प्रक्रियेला फाटा देत राज्य शासनाने संपूर्ण राज्यात नुकसान झालेल्या खरीप हंगामातील कोरडवाहू आणि बागायती पिके, बहुवार्षिक फळपिकांचे पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार कृषी विभाग व महसूल विभाग गेल्या आठ दिवसांपासून शेतकर्यांच्या बांधावर आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात हंगामी पिके, बागायती पिके आणि बहुवार्षिक फळपिकांची माहिती संकलित होताच सरकारच्यावतीने शेतकर्यांना मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात यंदा पावसाने हात दाखवल्याने ऐन पावसाळ्यात दुष्काळासारखी स्थिती आहे. राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्यातील 15 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला असून त्या ठिकाणी ट्रिगर 1 लागू केलेला आहे. दुसरीकडे नगरसह राज्यात या यापूर्वी ट्रिगर 1 मध्ये पात्र ठरलेल्या तालुक्यांमधील 10 टक्के गावांमध्येच (उदा. जिल्ह्यातील जिल्ह्यात 1 हजार 610 पैकी 160 गावे) सॅटेलाइट डेटा आणि एनडीव्हीआय-एनडीडब्लूआय (शेती, वनस्पती आणि पाण्याच्या स्रोतांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाणारे दोन महत्त्वाचे रिमोट सेन्सिंग निर्देशांक) या आधारे महाराष्ट्रात शासनाकडून दुष्काळ जाहीर करतानाही या निर्देशांकांचा मुख्य निकष म्हणून वापर केला जातो. परंतु, अनेक ठिकाणी उपग्रहाचा डेटा ग्राउंड रिलिटीशी जुळत नसल्याने शेतकर्यांना भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे यंदा सरकारने या जाचक अटींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य शासनाने थेट सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता शेतकरी पिकांचे नुकसान झालेल्या प्रत्येक भागात प्रत्यक्ष पंचनामे केले जात आहेत.
यात प्रपत्र ‘अ’ मध्ये हंगामी पिके, प्रपत्र ‘ब’ बागायती पिके आणि प्रपत्र ‘ड’ मध्ये बहुवार्षिक फळपिके यांची एकत्रित माहिती प्रपत्र ‘ड’मध्ये सर्व पिकांची एकत्रित माहिती या वर्गवारीनुसार गावनिहाय, तालुका निहाय आणि जिल्हा निहाय अहवाल तयार करून ती शासनाला सादर करण्यात येणार आहे. ही माहिती पुढील आठवड्यात संकलित होणार असून यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्यांना तातडीने व विनाविलंब भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, महसूल व कृषी विभाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दसर्यांनतर भरपाईचा दिलासा
काही वर्षापूर्वी नगर जिल्ह्यात अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. यंदा देखील कृषी आणि महसूल विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात दसर्यानंतर दुष्काळग्रस्ते शेतकर्यांच्यावर भरपाईची रक्कम जमा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.




