अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी येत्या 23 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दाखल अर्जाच्या माघारीची मुदत आज (दि.11) रोजी दुपारी 3 वाजता संपणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून यामुळे जिल्ह्यात उन्हाच्या चटक्यासोबत माध्यमिक शिक्षकांचे वातावरण तापणार आहे.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक 14 फेब्रुवारीला जाहीर झाली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटची मुदत होती. आज दाखल अर्जाच्या माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून त्यानंतर निवडणूक लढवणार्या उमेदवारांची अंतिम यादी समोर येणार आहे.
दरम्यान, उद्या बुधवारी चिन्हासह अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. माध्यमिक सोसायटीसाठी 9 हजार 152 मतदार पात्र आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 162, अनुसूचित जातीजमाती मतदारसंघासाठी 21, महिला प्रवर्गासाठी 22, ओबीसी प्रवर्गासाठी 21 आणि भटक्या प्रवर्गासाठी 16 असे उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यानंतर दाखल अर्जाची छानणी होवून माघारीसाठी मुदत होती. ही मुदत आज संपणार आहे.
आतापर्यंत निवडणूक शांतच
यंदा माध्यामिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचे वातावरण शांतशांत दिसत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारी दाखल करून आता माघारीचा शेवटचा दिवस उजाडल्यानंतर देखील माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीचे वातावरण थंड दिसत आहे. सत्ताधार्यांसमोर आव्हाण करण्यात विरोधकांना यश येतांना दिसत नाही. विरोधकांचे अनेक गटात झालेली फाटाफूट ही यंदा देखील सत्ताधारी प्रा. भाऊसाहेब कचरे गटाच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे.