अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लेखापरीक्षणात नमूद करण्यात आलेल्या 15 कोटी रुपयांच्या तफावतीच्या मुद्द्यावरून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत रविवारी पुन्हा जोरदार खडाजंगी झाली. यावेळी माईकवर बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नेत्यांसह संचालकमध्ये शाब्दिक चकमकीच्या फेरी झाल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर जावे लागले. त्यामुळे काही सभासदांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभा सुरळीत पार पडली.
सभनंतर सत्ताधार्यांनी विरोधकांचा आवाज दाबत त्यांना बोलवण्याची संधी न देता लाईट बंद करत सभा गुंडाळ्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
नगर शहरातील एका मंगल कार्यालयात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अर्जुन वाळके, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब जगताप, माजी अध्यक्ष दिलीप काटे, कल्याण ठोंबरे, सचिव स्वप्नील इथापे तसेच आजी-माजी संचालक उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष शिंदे यांनी सोसायटीच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना संस्थेच्या ठेवींमध्ये 20 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले. कर्जमर्यादा 18 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आल्याची तसेच लेखापरीक्षकांच्या शुल्कात सुमारे 9 लाख रुपयांची बचत झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सभासद वैभव सांगळे यांनी या माहितीवर आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना अध्यक्ष शिंदे म्हणाले, 25 वर्षांनंतर सत्तांतर होऊन आम्ही कारभार हाती घेतला. मात्र मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील लेखापरीक्षणात सुमारे 15 कोटी रुपयांची तफावत नोंदविण्यात आली आहे. त्या बाबींसाठी विद्यमान संचालक मंडळ जबाबदार राहणार नाही. सभासद संतोष कानडे यांनी मागील वर्षी सोसायटीच्या नावात शिक्षक व शिक्षकेतर असा बदल करण्याचा ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष शिंदे यांनी, प्रथम अहमदनगरचे अधिकृत नाव बदलून अहिल्यानगर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर पुढील बदल केले जातील, असे स्पष्ट केले. यानंतर वर्गणी वाढविण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चा रंगली. काही सभासदांनी बोलण्याचा आग्रह धरताच व्यासपीठासमोर गोंधळ निर्माण झाला.
माईकवरूनही काही काळ खेचाखेची झाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन उपस्थित पोलिस व्यासपीठावर गेले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र काही शिक्षक सभासदांनी त्यावर आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिस पुन्हा आपल्या जागेवर परतले आणि सभा पुढे सुरू राहिली. सभेत रमजान हवालदार यांनी वार्षिक अहवाल पुस्तिकेत सर्वसाधारण सभेचे छायाचित्र समाविष्ट करण्याची सूचना केली. सभासद महेश दरेकर यांनी थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली, तर वैभव सांगळे यांनी कर्ज मागणीचे प्रमाण कमी होण्यामागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित केला. अखेरीस वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर उर्वरित कामकाज आटोपून सभेची सांगता करण्यात आली. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या जुन्या इमारतीचे ऑडिट न करता त्या ठिकाणी नव्याने तिसर्या मजल्यावर बांधकाम करण्याचा घाट आहे. त्या ठिकाणी मनपा आणि सहकार विभागाची परगवानी आवश्यक असतांना इमारत गळत असल्याचे कारण पुढे करत त्या तिसर्या मजल्यावर पत्र्याचे शेड बांधण्यात येत असल्याचा आक्षेप विरोधी गटाच्या संचालकांनी घेतला.
सहकार खात्याकडे 35 लाख पडून
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी सहकार खात्याकडे 35 लाख रुपये जमा करण्यात आलेले होते. आता निवडणूक होवून दुसरे वर्ष असताना संचालक मंडळाने अद्याप सहकार खात्याकडून त्या 35 लाख रुपयांचा हिशोब घेतला नाही. आजही हे 35 लाख सहकार खात्याकडे पडून असल्याचा आक्षेप यावेळी विरोधकांनी घेतला.
15 कोटींच्या तफावतप्रकरणी चौकशी- शिंदे
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो ऑडिट अहवाल. ऑडिटरने ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदींमध्ये मोठी विसंगती आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिले असून सुमारे 15 कोटी रुपयांची तफावत असल्याचे सांगितले आहे. ही तफावत पूर्वीच्या कार्यकाळातील असल्याचा दावा करत नवीन संचालक मंडळ याची जबाबदारी स्वीकारणार नाही. या प्रकरणातील दोषींवर चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा चेअरमन शिंदे यांनी दिला.
लाईट गेली आणि सभा संपली
सभा सुरळीत सुरू असतानाच माजी अध्यक्ष चांगदेव खेमनर बोलण्यात उभे राहिले आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाला. काही काळ प्रतिक्षा करूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. शेवटी सभा संपल्याची घोषणा करण्यात आली.
10 गुंठे जागेवर साकारणार वस्तीगृह
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांसाठी नगर शहरात 10 गुंठे जागा मिळवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. जागा मिळताच मोठे वस्तीगृह उभारण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष शिंदे यांनी दिली.
दारूडा शिक्षक थेट व्यासपिठावर
सभेदरम्यान दारूच्या नशेत व्यासपीठावर आलेल्या एका सभासदाला बाहेर काढण्यात आले. तसेच प्रश्न विचारण्यासाठी अनेक सभासद एकाचवेळी व्यासपीठाकडे आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही सभासदांनी थकबाकीदारांची नावे वार्षिक अहवालात प्रसिद्ध करण्याची सूचना केली. संतोष कानडे यांनी लाभांश कमी मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रामदास जंजीरे यांनी एनपीएसाठी 30 लाख रुपयांची कर्जवसुली करण्याची मागणी केली, तर चांगदेव खेमर यांनी ऑडिट फीचा मुद्दा उपस्थित केला.




