अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सर्जेपुरा परिसरात गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाची 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर संबंधित कुटुंबाला स्वतःचे घर पाडण्यास भाग पाडून आघोरी विधी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कथित भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिव आण्णासाहेब सोनवणे (वय 23 रा. रंगभवनजवळ, सर्जेपुरा) असे त्या भोंदूबाबाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (16 मेपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत सोनाली महेश काळोखे (वय 22, रा. रंगभवनजवळ, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे पती महेश काळोखे हे मजुरीचे काम करतात. त्यांचे कुटुंब सर्जेपुरा परिसरात वास्तव्यास आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या पतीचा मामाचा मुलगा शिव सोनवणे हा परिसरात आघोरी बाबा म्हणून परिचित असून तो अंधश्रध्दा, भोंदूगिरी आणि जादूटोण्याचे प्रकार करत असल्याची माहिती आहे. फिर्यादींचे वडिलोपार्जित घर हे शिव याच्या घरामागे असून त्या जागेखाली गुप्तधन असल्याचे शिव याने सांगितले. 5 फेब्रुवारी 2026 रोजी शिव हा फिर्यादींच्या घरी आला. त्याने तुमच्या घराखाली सोने असून माझ्या आघोरी विद्येच्या साहाय्याने ते बाहेर काढून देतो, असे सांगून त्यासाठी जादूटोण्याच्या साहित्याकरिता 50 हजार रूपये लागतील, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादींच्या कुटुंबाने 6 फेब्रुवारी रोजी त्याला रोख 50 हजार रूपये दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शिव याच्या सांगण्यावरून संबंधित कुटुंबाने स्वतःचे घर पाडले.
फेब्रुवारी महिन्यात मध्यरात्री शिव याने त्या जागेवर कथित आघोरी विधी केल्याचा आरोप आहे. यावेळी लिंबू, मानवी कवटी, हाडे, हळद-कुंकू, भस्म आदी साहित्य मांडून मोठ्याने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर जागा खोदण्यास सांगण्यात आले; मात्र तेथे कोणतेही गुप्तधन मिळाले नाही. यानंतर फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी शिव कडे 50 हजार रूपये परत मागितले. सुरूवातीला विधीच्या साहित्यावर पैसे खर्च झाले असे सांगून त्याने वेळकाढूपणा केल्याचे सांगण्यात आले.
अखेर 11 मे 2026 रोजी शिव याने मी पैसे परत देणार नाही. ही जागा आता माझी आहे. माझ्या नादी लागलात तर आघोरी प्रयोग करून संपवून टाकीन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात काळोखे कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करून मंगळवारी (12 मे) रात्री उशिरा गुन्हा दाखल करून भोंदूबाबा शिव सोनवणे याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ अधिक तपास करीत आहेत.
मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ
शिव सोनवणे हा परिसरात आघोरी बाबा म्हणून परिचित असून तो अंधश्रध्दा, भोंदूगिरी आणि जादूटोण्याचे प्रकार करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल जप्त केला असून यामध्ये जादूटोणा केल्यासंदर्भातील अनेक व्हिडीओ आहेत. तसेच सर्जेपुरा, रामवाडी, सिध्दार्थनगर परिसरातील अनेक लोक शिव सोनवणे याच्याकडे जात होते. तो अंधश्रध्दा, भोंदूगिरी व जादूटोणा करून लोकांकडून पैसे उकळीत असल्याचा आरोप आहे.
मारहाण केल्याचा आरोप
दरम्यान, यासंदर्भात सुरूवातीला महेश भास्कर काळोखे (वय 29) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (12 मे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये शिव सोनवणे याच्यासह ओम आण्णासाहेब सोनवणे, कोहिनुर आण्णासाहेब सोनवणे (सर्व रा. रंगभवन) व यश सागर सोळशे (रा. बोल्हेगाव) यांचा संशयित आरोपी म्हणून समावेश आहे. जमिनीच्या विक्रीच्या वादातून संशयितांनी फिर्यादीच्या कुटुंबावर हल्ला करून मारहाण केल्याचा आरोप आहे.




