Saturday, November 23, 2024
Homeनगरसुरक्षा ठेवीचे व्याज वीज बिलातून वळते

सुरक्षा ठेवीचे व्याज वीज बिलातून वळते

9 लाख 88 हजार ग्राहकांना 12 कोटी 66 लाखांचा परतावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महावितरणच्या नगर मंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजाचे समायोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 9 लाख 88 हजार 26 वीज ग्राहकांना व्याजाच्या रूपाने 12 कोटी 66 लाख 40 हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यातील वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे. वीज कायदा 2003 नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी सन 2023-24 मध्ये महावितरणच्या नगर मंडळातील ग्राहकांना परतावा दिला गेला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युतपुरवठा संहिता 2021 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती.

आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे तसेच विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन 2023-24 मध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील 24 लाख 82 हजार 139 ग्राहकांना 31 कोटी 14 लाख 67 हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा मागील दोन महिन्यांच्या वीज बिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात आला आहे.

असे झाले समायोजन
ग्रामीण विभागातील 1 लाख 79 हजार 253 ग्राहकांना 2 कोटी 30 लाख 22 हजार, नगर शहर विभागातील 2 लाख 75 हजार 743 ग्राहकांना 3 कोटी 97 लाख 14 हजार, कर्जत विभागातील 1 लाख 43 हजार 782 ग्राहकांना 1 कोटी 98 लाख 6 हजार, संगमनेर विभागातील 3 लाख 2 हजार 739 ग्राहकांना 3 कोटी 40 लाख 41 हजार, श्रीरामपूर विभागातील 86 हजार 509 ग्राहकांना 1 कोटी 57 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या