छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
बंद पडलेल्या कंपनीच्या (Company) सुरक्षेसाठी त्यातील सामग्री चोरट्यांनी नेऊ नये यासाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी संगनमत करून कंपनीतील सर्वच्या सर्व सामग्री भंगारात विकून टाकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
एमआयडीसी चिकलठाणा येथील बंद पडलेल्या कंपनीतील भंगार सुरक्षा रक्षकांनी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको एमआयडीसी पोलिसांसमोर आला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोन सुरक्षारक्षकांसह चोरीचा माल घेणाऱ्या तिघांना गजाआड केले. सुरक्षारक्षक सुपरवायझर ज्ञानेश्वर राऊत (४०, रा. पिसादेवी), सुरक्षा रक्षक किशोर जाधव आणि अस्लम खान (२८, रा. नारेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
विनित चंद्रन (५४) यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद दिली. चिकलठाणा एमआयडीसीमध्ये संवर्धना मदरसन इनोव्हेटिव्ह सोल्युशन लिमिटेड या कंपनीत ते मुख्य अधिकारी आहेत. कंपनीचे दोन युनिट असून चिकलठाणा एमआयडीसीतील एफ-२ हे युनिट बंद पडले आहे. तेथे कंपनीचे मोठ-मोठे शेड व इतर लाखो रुपयांचे साहित्य असल्याने जी-४ कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. वेगवेगळे सात सुरक्षारक्षक तीन शिफ्टमध्ये तेथे ड्यूटीवर असतात. २२ जून रोजी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी कुमारपाल कोठारी यांनी अचानक कंपनीला भेट दिली. तेव्हा तेथील तीन औद्योगिक शेडचे अँगल कापलेले दिसले. दुचाकींचे स्टँड, ३ जनरेटर रुमची दारे, कार्यालयीन खोल्यांच्या सर्व लोखंडी खिडक्या, खिडक्यांच्या फ्रेम गायब झाल्याचे समोर आले. कंपनी कार्यालयाचे अल्युमिनीयमचे दरवाजेही लंपास झाले होते.
यावेळी कंपनीचे जवळपास १४ लाखांचे साहित्य चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी तपास सुरू केला. दरम्यान, बंद कंपनीच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांवर आधीपासूनच संशय होता. मात्र, सात जणांपैकी नेमकी कोणी चोरी केली, हे शोधण्यासाठी पोलिसांनी सर्वांना धारेवर धरले. उलटतपासणी केली. संशयितांना ठाण्यात आणून खाक्या दाखविल्यानंतर राऊत आणि जाधव यांनी चोरीची कबुली देत नारेगाव येथील अस्लम खानला भंगार विकल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांनाही अटक केली.