मुंबई | Mumbai
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) दारूण पराभव झाला. या निवडणुकीत महायुतीला २३६ तर महाविकास आघाडीला ४९ जागा मिळाल्या. यात ९५ जागा लढवूनही मविआतील ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या २० जागांवर विजयाचा गुलाल उधळता आला. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने आपला विधिमंडळ गटनेता, प्रतोद आणि विधानसभा गटनेत्याची निवड केली आहे.
त्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena UBT) विधानसभेतील गटनेतेपदी सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या भास्कर जाधव यांची (Bhaskar Jadhav) निवड करण्यात आली. तर शिवसेनेच्या प्रतोदपदी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सयुंक्त विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) निवड करण्यात आली आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक घेत प्रत्येक आमदाराकडून शपथपत्र लिहून घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत उपस्थित आमदारांना (MLA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मार्गदर्शन करून विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या कारणांवर चर्चा केल्याचे समजते. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला न मिळाल्याने हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त आमदार पुढीलप्रमाणे
सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, नितीन देशमुख, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव, वरुण सरदेसाई, अनंत (बाळा) नर, महेश सावंत, हरुन खान, मनोज जामसूतकर, सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, संजय देरकर, राहुल पाटील, बाबाजी काळे, प्रवीण स्वामी
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा