Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखसाठच्या दशकातील स्वप्न निमाले

साठच्या दशकातील स्वप्न निमाले

बदल का काळाचा स्थायीभाव. महिलांच्या संदर्भात सामाजिक परिस्थितीही बदलत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दिले जाणारे दुय्यमत्व त्यांच्यासाठी नवे नाही. वर्षानुवर्षे ते त्यांच्या जणू अंगवळणी पडले असावे. आधुनिक काळातही अनेकजणी त्याचा काच जाणवत असल्याची भावना व्यक्त करताना आढळतात. सुमारे साठच्या दशकात सामाजिक मान्यतांचा आणि रूढींचा पगडा किती घट्ट असू शकेल याची कल्पना सद्यस्थितीवरून देखील करता येऊ शकेल. तथापि त्याकाळातही महिलांना स्वावलंबनाचे स्वप्न दाखवणाऱ्या, त्यांच्याच हातातील लाटणे-पोळपाटाचा सन्मान वाढवणाऱ्या आणि लिज्जत पापडाचे साम्राज्य उभारणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांनी नुकताच या जगाचा कायमचा निरोप घेतला.

तेव्हा पोरके झाल्याची भावना हजारो महिलांच्या मनात निर्माण झाली असेल. १९५९ साली जसवंतीबेन, त्यांच्या ६-७ मैत्रीणी एकत्र आल्या आणि त्यांनी पापड लाटून ते विकण्याचे स्वप्न पाहिले. त्याच्या पूर्ततेमध्ये आलेल्या अडथळ्यांचा सामना केला. त्याच उद्योगाचा आता वटवृक्ष झाला आहे. या उद्योगाने सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार दिला आहे. बहुसंख्य महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायची इच्छा असते. पण त्याचे मार्ग माहित नसतात. शिवाय अनेक कालबाह्य रूढी-परंपरा, सामाजिक स्थिती, आर्थिक अवलंबित्व आणि काही प्रमाणात कौशल्यांचा अभाव यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास कमी आढळतो. त्यांच्यात आत्मसन्मानाचा अभाव कोणालाही जाणवावा इतका ठळक असतो. ‘बाईची धाव स्वयंपाकापूरती’ असे आजही महिलांना हिणवले जाते हे वास्तव आहे. त्याच स्वयंपाकघराला आणि त्यातील कौशल्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम कळत-नकळत जसवंतीबेन यांनी केले. पोळपाट लाटणे हे उत्पन्नाचे साधन बनू शकते हा आत्मविश्वास त्यामुळेच अनेक सामान्य महिलांमध्ये जागा होऊ शकला असावा. ‘

- Advertisement -

आम्ही जास्त शिकलेल्या नव्हतो. त्यामुळे नोकरीच्या संधी कमीच होत्या. नव्हत्या असेच म्हणावे लागेल. तथापि पापड बनवण्याचे कौश्यल्य आमच्याकडे आहे याची आम्हाला जाणीव झाली. त्याचाच वापर आम्ही करून आम्ही कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो हे आमचे आम्हालाच एक दिवस कळाले’ अशा भावना त्या नेहमी व्यक्त करत. १९६० सालच्या या भावना एकविसाव्या शतकातही अनेक जणींसाठी वास्तव असू शकेल. त्यांनी महिलांना स्वप्न बघण्याची प्रेरणा दिली. त्याचे मार्गही दाखवले. त्यात अडथळे येऊ शकतात याची जाणीव करून दिली. टोकाला न जाता समतोल साधून त्यावर मार्ग काढता येऊ शकतो हे स्वआचरणातून दाखवून दिले. सरकारनेही त्याची दखल घेऊन त्यांचा पदमश्री पुरस्काराने गौरव केला. अनेक महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा बाळगतात. काही जणी सुरूही करतात. तो स्थिर कसा करावा, स्वपूर्तीसाठी कोणते गुण आणि वृत्ती आवश्यक असते यासाठी जसवंतीबेन यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास करू शकतील. त्यातून कदाचित संघभावना, चिकाटी, सर्जनशीलता, आत्मविश्वास, सातत्य आणि सामावून घेण्याची शक्ती या गुणांचा वारसा मिळू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या