घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, असे आपल्याला वाटते तर त्यांना स्वावलंबनाचे योग्य धडे द्या. त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीसाठी स्वावलंबन त्यांच्या उपयोगी येईल. त्यामुळे आयुष्यात येणार्या संधीचे मार्ग ते यशस्वीपणे हाताळतात व त्यातूनच ते जीवनाला यशस्वीपणे सामोरे जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला राजकारणाचे धडे तर दिलेच पण त्या बरोबर स्वावलंबनाने जगण्याचा मार्गही दाखवला . स्वावलंबनातूनच सत्याचा मार्ग सापडतो. गांधीजी चरखा चालवत असत. ह्या चरख्याने फक्त स्वाभिमानच नाही तर शारीरीक मेहनतीचे महत्वही शिकवले . स्वावलंबनाने आयुष्याला शिस्त लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी.
तसे पाहिले तर आजची शहरातील मुले जरा जास्तच लाडावलेली दिसत आहेत. बर्याच मुलांना काम करणे माहितच नाही उलट पालकच त्यांच्या पुढे पुढे करतात. येथे मुलांना पालक आपल्यासाठी करत असणार्या कामांची किंमत समजत नाही. कारण त्यांना वाटते ते काम आपल्या पालकांचेच आहे व आपला त्या कामाशी काही संबंध नाही. कामे आपण त्यांना शिकवली पाहिजेत . कामे एकदा अंगवळणी पडली की मुले सवयीने आपोआप करू लागतात ग्रामीण भागात मुला मुलींना काम शिकवावे लागत नाही तर तेथील काळ्या मातीतच स्वावलंबनाचे बीज पेरलेले असते. आम्हा भावंडांना लहानपणापासूनच घरात काम करण्याची सवय होती.
मी सहावीत होते त्या वेळी आईने चांगल्या भाकरी करण्यास शिकवले होते. त्यामुळे हळूहळू सर्वच स्वयंपाक करण्यास मी शिकले होते. आम्ही भावंड अभ्यासाबरोबर घरची अनेक कामे आनंदाने करत होतो. स्वावलंबन हा एक मंत्र आहे . अनेक गरजू मुले सकाळी पेपर टाकणे, बूट पॅालिश करणे, दुधाच्या पिशव्या आणणे किंवा डबे पोहोचविणे अशी कामे उत्स्फूर्तपणे करतात. अशा गुणी मुलांचा पालकांनाही अभिमान वाटतो. हाच पैसा शिक्षणाला व घरातील खर्चासाठी उपयोगाला येतो. शारीरीक कष्टाने आनंद, पैसा, समाधान मिळते व सकारात्मक उर्जाही मिळते जी पुढील आयुष्यास उपयोगी असते. आत्मनिर्भर बनल्यामुळे स्वतःवरील विश्वास वाढतो. स्वावलंबन हा प्रगतीचा मोठा मार्ग आहे. त्यामुळे धडपड करण्याची वृत्ती वाढते .
अनेकदा मुले बारावी उत्तीर्ण झाली की पुढील शिक्षणासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागते. अशावेळी लहानपणापासून केलेली कामे उपयोगाला येतात. स्वावलंबनामुळे आनंद व समाधान या दोन्ही गोष्टी मिळतात व मन आणि शरीर टवटवीत राहते . स्वावलंबनाने सन्मानही मिळतो व आत्मविश्वासही वाढतो. जगण्यातील उमेद वाढते. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ म्हणजेच प्रयत्न करून स्वतः काम केले तर यश नक्कीच मिळते . क्रमशः