नाशिक। प्रतिनिधी Nashik
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तमराव एलिया कांबळे (वय ८२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या निधनामुळे शरणपूरसह शहर काँग्रेसवर शाेककळा पसरली आहे. शहरातील जनलक्ष्मी बँकेचे संचालकपद त्यांनी भूषविले हाेते. सहकार क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव हाेता. जनलक्ष्मी बँकेचे सर्वेसर्वा माधवराव पाटील यांचे ते निकटवर्तीय हाेते.
कांबळे यांनी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाचा आवाज बुलंद केला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सूचनेने निवडणुका लढविल्या. त्यात नाशिक महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले हाेते. महानपालिकेच्या प्रभाग क्रमांक बाराचे ते पहिले नगरसेवक हाेते. त्यांनी नगरसेवक असताना मिशनमळा, शरणपूर, सहजीवन काॅलनी, तिडके काॅलनी भागात विविध साेयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या हाेत्या.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून त्यांचा मुलगा समीर हा राजकारणात सक्रिय झाला. त्याने प्रभांग क्रमांक बारा मधून नगरसेवक पदाच्या निवडणूकीत यश मिळविले हाेते. तर, गेल्या काही महिन्यांपासून उत्तमराव कांबळे यांची प्रकृति अस्थिर हाेती. गुरुवारी उपचार सुरु असतानाच त्यांच्या निधनाची वार्ता पसरली. त्यामुळे शरणपूर राेड व इतर भागांत शाेककळा पसरली.