Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधसमतेचा आणि समरसतेचा संदेश ‘शाखांपलीकडचा संघ’ एक अद्‌भुत ग्रंथ

समतेचा आणि समरसतेचा संदेश ‘शाखांपलीकडचा संघ’ एक अद्‌भुत ग्रंथ

– विनोद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार, नागपूर

ज्येष्ठ संपादक, स्तंभलेखक, पत्रकारितेतील भीष्म पितामह म्हणून ज्यांचा उल्लेख करावा त्या लक्ष्मणराव जोशी अर्थात ल.त्र्यं.जोशी यांनी लिहिलेल्या शाखांपलीकडचा संघ या पुस्तकाचे आज दि.27 ऑगस्टला रविवारी नागपुरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. याआधी देखील त्यांचे ‘गावोगावी’हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.परंतु दोन्ही पुस्तकांचे विषय वेगवेगळे आहेत. आज प्रकााशित होणार्या शाखांपलीकडचा संघ या पुस्तकाच्या रूपाने लक्ष्मणरावांनी त्यांच्या नजरेतील संघ उभा केला आहे. त्यावर केलेले हे विश्लेषण…

- Advertisement -

नागपूर तरुण भारतमध्ये लक्ष्मणराव संपादक असताना आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाकाखाली सुरू केलेल्या पत्रकारितेचा आजपर्यंत प्रभाव कायम आहे.वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये काम करीत असताना वैचारिक पातळी हे कायम आव्हान असले तरी ते टिकवून ठेवण्याचे बळ लक्ष्मणरावांच्या प्रेरणेमुळेच माझ्यासारख्या अनेकांना मिळाले. याचे श्रेय त्यांचेच आहे. म्हणूनच प्रारंभीच त्यांंना शुभेच्छा देतो. लक्ष्मणरावांनी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पुस्तिकेतील प्रतिपादन संघासह कुणाच्याही सूचनेवरून केलेले नाही. ते उत्स्फूर्तच आहे. ते म्हणजे संघाची अधिकृत भूमिका आहे, असे मानण्याचेही कारण नाही. आपली भूमिका मांडायला संघ पूर्णपणे समर्थ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे स्पष्ट केल्यामुळे गैरसमजाला कोठेही जागा राहत नाही.

पुस्तकाच्या प्रारंभापासून त्यांनी केलेली मांडणी सहज समजणारी असली तरी काही गोष्टींचा यात उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. जसे- प्रचारक आजीवन अविवाहितच राहिले पाहिजे, असेही बंधन नाही. आपल्या इच्छेनुसार आयुष्यातील काही काळच ते हे व्रत पाळू शकतात. पण संघाकडे आजीवन प्रचारकांची संख्याच अधिक आहे. त्यांच्या जीवनशैलीचे मापदंडही एव्हाना प्रस्थापित झाले आहेत. त्यांचा निवास संघकार्यालयात असतो. जेथे कार्यालय नसेल तेथे कुणातरी स्वयंसेवकाच्या घरी असतो. भोजनाची व्यवस्थाही तशीच असते, पण चणेमुरमुरे खाऊन भूक भागविणारे, प्रसंगी उपाशी राहून संघकार्य करणार्‍यांचीही अनेक उदाहरणे आहेत. त्याने स्वत:चे कपडे स्वत:च धुतले पाहिजेत असा नियम नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या प्रचारककाळात कार्यालयात कपडे धुताना पाहणारे हजारो साक्षीदार आपल्याला आजही भेटू शकतील. या त्यांच्या पुस्तकातील उल्लेख नवयुवकांना प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे प्रचारक संघकार्य तर करतातच पण स्वयंसेवकांच्या कुटुंबाची काळजी घेण्यात, त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्याच्या प्रयत्नातही ते आघाडीवर असतात.

शाखांपलीकडील संघ ही नुसतीच कल्पना नाही. ते नि:संशय वास्तव आहे आणि ते संघानेच सिद्ध केले आहे. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे संघशाखांची संख्या मोजदाद करता येण्यासारखी असली तरी गेल्या 98 वर्षांत संघ एकाच जागी ‘मित:काल’ करीत राहिलेला नाही.‘मित:काल’ ही संघाच्या संचलनातील एक आज्ञा आहे. जेव्हा पथकातील स्वयंसेवकांना संचलन करताना एकाच ठिकाणी थांबून लेफ्ट-राईट करावे लागते तेव्हा ‘मित:काल’ ही आज्ञा दिली जाते. पण संघकार्य करताना, शाखांचा विस्तार करताना, स्वयंसेवकांची संख्या वाढविताना संघाने ‘मित:काल’ ही आज्ञा कधीही वापरली नाही. उलट चरैवेती चरैवेती प्रक्रिया अखंड सुरू ठेवण्यासाठी ‘प्रचल’ – चालत राहा – या आज्ञेचाच वापर केला आहे. त्यामुळे स्थानांची संख्या, शंभर वर्षातील वाटचाल व उद्दिष्टपूर्ती हे सोपे वाटणारे त्रैराशिक चुकले तर त्यात काय आश्चर्य काय ?

संघाची शिस्त काय याबाबत देखील या पुस्तकात उल्लेख आहे. लहानात लहान स्वयंसेवक त्याच्याकडील जबाबदारीनुसार आज्ञा देतो व त्याच्यापेक्षा सर्व बाबतीत श्रेष्ठ असलेले स्वयंसेवक त्याची आज्ञा निमूटपणे पाळतात. पण आज्ञेचा अर्थ तेवढा मर्यादितही नाही. त्या आज्ञेतून संघाला संपूर्ण समाजाला एका रांगेत उभे करायचे आहे, हा समतेचा आणि समरसतेचाही संदेश काहीही न बोलता स्वाभाविकपणे दिला जातो. आपल्या शेजारी रांगेत उभा असलेला स्वयंसेवक किती शिकलेला आहे, कोणत्या जातीचा आहे, कुठल्या उत्पन्नगटातला आहे याचा यत्किंचितही विचार होत नाही.

राजकारण हा राजकीय नेत्यांचा तर चोवीसही तासांचा व्यवसाय वा छंद बनला आहे.नव्हे त्यांच्यासाठी ते अपरिहार्यच झाले आहे. पण इतरही क्षेत्रांत कार्य करणार्या संघ परिवारातील संस्थांनीही आपापल्या क्षेत्रात अतिशय मोलाचे कार्य केले आहे आणि करीत आहेत. इंटक, आयटक या केंद्रीय कामगार संघटना भामसंच्या आधी कितीतरी वर्षे कार्य करीत असल्या तरी देशात सर्वाधिक सदस्यसंख्या असणारी कामगार संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाने प्रथम स्थान मिळविलेले आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराची निर्मिती ही विश्व हिंदू परिषदेच्या ऐतिहासिक कार्याची पावतीच म्हणावी लागेल. राष्ट्रसेविका समितीचे महिलांच्या क्षेत्रातील कार्य वा संस्कार भारतीसारख्या संस्थांचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य आत्मविस्मृत समाजाला त्या भोवर्यातून काढणारेच आहे.

संघ परिवारातील संस्थांचे कार्य जसे अविरत सुरू असते तसेच समाजात कार्य करणार्याही अनेक अनौपचारिक संस्था आहेत. वर्षानुवर्षे त्या कार्य करीत आहेत. जशा संस्था कार्यरत आहेत, तशा व्यक्तीही कार्यरत आहेत. पण समाजकार्यात आपण महत्त्वाचे योगदान देत आहोत हेही त्यांच्या गावी नसते. आपल्याला जे योग्य वाटले ते त्या करीत आहेत. उदाहरणेच द्यायची असली तर देशात सर्वत्र पसरलेली मंदिरे, तीर्थक्षेत्रे, त्यांच्या यात्रादी समारंभाचे आयोजन. महाराष्ट्रातील दर आषाढी व कार्तिकी एकादशीला निघणारी वारकर्‍यांची दिंडी. त्यांची नोंद कागदोपत्री असेल वा नसेल; पण त्यांची संख्या काही लाखांच्या घरात सहज जाते. एका गावात एकच मंदिर असेल असेही म्हणता येत नाही. गावांच्या, शहरांच्या आकारानुसार अनेक मंदिरे आहेत.आपल्याकडे देवांची संख्या तर तेहतीस कोटी आहे. त्याशिवाय कुलदैवते वेगळीच. मरीआईही वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहेतच. त्या मंदिरांशी लोक जुळलेले असतात. मठ, बुद्ध विहार, अजमेर सारखे दर्गे कार्यरत आहेतच. त्यांच्या जोडीलाच वर्षभर कोणते ना कोणते उत्सव साजरे केले जातात. जत्रा किंवा यात्रा हे त्यांचे मूर्त स्वरूप. भजन सप्ताह, भागवत कथा, महाभारताचे वाचन यासारख्या आयोजनाच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येतात. शीख समुदायातील लंगर हे तर समाजाच्या एकतेचे अनोखे दर्शनच, समतेचा उद्घोष. तेथे सर्व जण सारखेच, संघाच्या भाषेत सांगायचे झाल्यास एकश:

संपत्. लोक आपल्या श्रद्धास्थानांकडून प्रेरणा घेतात. ती आपल्या जीवनात साकार करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही यशस्वी होतात तर काही कोरडेही राहत असतील. आज शताब्दीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या संघकार्याचे अधिक सूक्ष्म अवलोकन केले असता आत्मनिर्भर समाज हेच संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे व त्याच दिशेने कुठलीही घाई न करता संघाची वाटचाल ‘चरैवेति चरैवेति’ भावनेने सुरू आहे. ‘न वै राज्ञोऽसीत् न दण्डो न च दाण्डिक: धर्मेणैव प्रजासर्वा रक्षन्ति स्म परस्परम’ असे त्या समाजाचे वर्णन महर्षी व्यासांनी महाभारताच्या शांतिपर्वात केले आहे. संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतून हेच सूत्र गवसले, या विचाराने लक्ष्मणरावांनी पुस्तकातील शेवटच्या टप्यात उल्लेख करीत एक दिशा दाखविण्याचे काम केल्याचे शेवटी नमूद करावेसे वाटते.अर्थात शाखांपलीकडचा संघ समजण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावेच लागेल, यात शंका नाही.

श्र ‘शाखांपलीकडचा संघ’

श्र लेखक – ल.त्र्यं.जोशी

श्र प्रकाशक – मकरंद कुलकर्णी

सीताबर्डी, नागपूर -440012

श्र मुखपृष्ठ – ऋतुजा ग्राफिक्स,

श्र मूल्य – 60 रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या