मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत महाराष्ट्राचा (Maharashtra) सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) घोषणा केली. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला आहे.१०० वर्षीय राम सुतार हे मागील जवळपास सात दशकांपासून शिल्पकार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे आणि मूर्ती उभारल्या आहेत. त्यांच्या या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार असून त्यांचा जन्म इ.स.१९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील (Dhule District) गोंदूर येथे झाला होता. सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये,पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. त्यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संसद परिसरात १६ पुतळे
राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे जवळपास १६ पुतळे बनवले.
राम सुतार यांनी साकारलेली महत्त्वाची शिल्पे
संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे राम सुतार यांनी घडविले आहेत.