नाशिक | Nashik
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज (२३ फेब्रुवारी ) पहाटे २ वाजून ०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W५४ या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशींचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतर केले. त्यांनी एम ए आणि एलएलबीची पदवी घेतली. मुंबईत कोहिनूर नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले होते. याशिवाय मुंबई पालिकेत अधिकारी पदावर कामही केले.
दरम्यान, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत.
मनोहर जोशी हे शिवसेनेचे कडवट शिवसैनिक होते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवले होते.