मुंबई | Mumbai
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता.
विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा शालेय जीवनापासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये त्या प्राध्यपिका म्हणून रुजू झाल्या. दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय या कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले. त्यानंतर त्या रुईया कॉलेजमधून निवृत्त झाल्या.
पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव, एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित इत्यादी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिला.