मुंबई | Mumbai
मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे (R R Borade) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) बोराडे यांनी अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून साहित्यिक वर्तुळात ओळख मिळाली होती.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) जीवन गौरव पुरस्कार (Jeevan Gaurav Award) त्यांना घोषित करण्यात आला होता. २७ फेब्रुवारीला या पुरस्काराचे वितरण होणार होते, पण त्यापूर्वीच ज्येष्ठ साहित्यिक रा.र.बोराडे यांची प्राणज्योत मालवली. रा.रं. बोराडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रा.र.बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील (Latur District) ‘काटगाव’ सारख्या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. यानंतर माढा, बार्शी, सोलापूर, संभाजीनगर अशा शहरातून शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमिताने त्यांचे वास्तव्य शहरी भागात होते. तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने आणि तिथल्या ऋतूचक्राने घडविलेला मन:पिंड कायम राहिला.
तसेच १९५७ साली रा.र.बोराडे यांची पहिली कथा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या १९६२ साली आलेल्या ‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोधळ’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ’वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहानी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून वाचा फोडली.
दरम्यान, मराठवाड्यातील (Marathwada) माणसं, स्त्री शोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेती, निसर्ग, देव, दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामीण परंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचं बेरकीपण या विषयांभोवती त्यांनी लिखाण करत मराठी ग्रामीण साहित्याला (Rural Literature) समृद्ध करण्याचे काम केले.