Saturday, July 27, 2024
Homeनगरशिक्षक आमदारकीच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील : आ. राम शिंदे

शिक्षक आमदारकीच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील : आ. राम शिंदे

विवेक कोल्हे व राजेंद्र विखे इच्छुक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीतून विवेक कोल्हे व राजेंद्र विखे असे दोघे इच्छुक आहेत. महायुतीचे वरिष्ठ नेते उमेदवारीबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आ. राम शिंदे यांनी दिली. येत्या 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव होणार असून त्याची माहिती देण्यासाठी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अरुण मुंडे आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.

- Advertisement -

नाशिक विभागातील इतर जिल्ह्यांतील इच्छुकांबाबत मला माहिती नाही. परंतु नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे व राजेंद्र विखे इच्छुक आहेत. मात्र अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आ. शिंदे यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाविषयी माहिती देताना आ. शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर आदी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाला येत्या 31 मे पासून सुरूवात होणार आहे, त्यामुळे त्यांचे जन्मस्थळ असलेले चौंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने परिसराचा विकास करण्याचे नियोजन आहे. मागील वर्षी 31 मे 2023 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने नामकरणाचा हा विषय मंजूर केला आहे व अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारकडून या नामकरणाची अंमलबजावणी अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. मात्र, आम्ही जयंती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणाचेही नाव टाळले नाही. आमदार रोहित पवारांचे नाव आम्ही टाकले, असे सूचक भाष्यही त्यांनी केले. कुकडीचे आवर्तन येत्या दोन-तीन दिवसांत सुटेल, यामुळे जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर लोकसभेत विखेंचा विजय
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना आ. शिंदे म्हणाले, निवडणूक काळात अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, अनेक तथाकथित सर्व्हेअर निर्माण झाले होते. आचारसंहितेच्या काळात सर्व्हे रिपोर्ट जाहीर करायचे नसतात, तरीही ते जाहीर होत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरला झालेली सभा, त्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व दुर्लक्षित-उपेक्षित समाज घटकाला मागील 10 वर्षांत मिळालेला न्याय व झालेले सहकार्य याची जाणीव मतदारांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे ठरवले असल्याचे सभा व प्रचारातून मला जाणवले. त्यामुळे नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील निश्चित विजयी होणार आहेत व येत्या चार जूनला हाच निकाल लागेल, असा दावा त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या