Saturday, May 4, 2024
Homeनगरसप्टेंबरमध्ये 11 तालुक्यांत पावसामुळे 59 कोटींचे नुकसान

सप्टेंबरमध्ये 11 तालुक्यांत पावसामुळे 59 कोटींचे नुकसान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात पावसाने शेतकर्‍यांची आणि पिकांची पूर्ण वाट लावली असून एकट्या सप्टेंंबर महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या

- Advertisement -

धुवाँधार पावसाने 11 तालुक्यांतील 387 गावांतील 1 लाख 16 हजार 638 शेतकर्‍यांचे 64 हजार क्षेत्रावरील पिकांना दणका बसला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे 58 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी आणि महसूल विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सप्टेंबरमधील पावसाच्या तडाख्यातून अकोले, कर्जत आणि जामखेड तालुका मात्र वाचलेले आहेत.

जिल्ह्यात सध्या ऑक्टोंबर महिन्यांच्या पहिल्या पंधारवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे जिल्हा यंत्रणेकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी गेल्या महिन्यात सप्टेंबर महिन्यांत अनेक तालुक्यात तुफान पाऊस झाला. जिल्ह्यात सलग आठ दिवस पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन, मका,बाजरी पिकांसह कांदा आणि फळबागा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे गावोगावी महसूल विभागाचे तलाठी, कृषी विभागाचे कृषी साहयक आणि संबंधीत गावातील ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे पंचनामे केलेले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात 387 गावांतील 1 लाख 16 हजार 638 शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. यात फळबागा सोडून जिरायत भागातील खरीप पिकांचे 40 हजार 823 हेक्टवर नुकसान झाले असून यात 27 कोटी 76 हजार रुपयांचा नुकसानीचा अंदाज आहे. तर फळबागा सोडून बागायात भागातील 22 हजार 855 हेक्टरवरील 30 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. यासह 128 हेक्टरवरील 23 लाख रुपयांचे नुकसान झालेले असून एकूण 63 हजार 807 हेक्टवर शेतकर्‍यांचे 58 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

पावसामुळे सर्वाधिक बाधित शेतकरी हे शेवगाव तालुक्यातील 37 हजार 27 असून त्याखालोखाल 36 हजार 349 शेतकरी हे राहुरी तालुक्यातील आहेत. कोपरगाव तालुक्यातील 14 हजार 657 शेतकरी, राहाता तालुक्यातील 9 हजार 890 शेतकरी, पाथर्डी तालुक्यातील 7 हजार 202 शेतकरी, पारनेर तालुक्यातील 5 हजार 860 शेतकरी, नगर तालुक्यातील 3 हजार 608 शेतकरी, श्रीरामपूर तालुक्यातील 1 हजार 929 शेतकरी यांच्या शेतीचे नुकसान झाले असून उर्वरित तालुक्यातील शेतकर्‍यांची संख्याही शंभरच्या आत आहे.

बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

नगर 1 हजार 926.11, पाथर्डी 5 हजार 380, पारनेर 3 हजार 76, कर्जत शुन्य, श्रीगोंदा 27, जामखेड शुन्य, श्रीरामपूर 963.74, नेवासा 8, शेवगाव 16 हजार 941, राहुरी 19 हजार 853, संगमनेर 33.34, अकोले शुन्य, कोपरगाव 8 हजार 612, राहाता 6 हजार 985.52 एकूण 63 हजार 807.94.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना उद्या दिलासा मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौर्‍यावर आहेत.आज बुधवारी(21 ऑक्टोबर) ते उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या होणार्‍या बैठकीत यावर चर्चा करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला जाईल, अशी महत्त्वाची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या