अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घरात काम करणार्या नोकराने 75 वर्षीय वृद्ध महिलेस खोटी माहिती सांगून इमोशनल ब्लॅकमेल करुन अडीच लाख रुपयाची खंडणी मागितल्याची घटना बालिकाश्रम रोडवरील बोरुडेमळा येथे घडली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात वैभव अजय बोरुडे (वय 30 रा. बोरुडेमळा, बालिकाश्रम रोड, अ.नगर) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी यांचे सावेडी परिसरात हॉटेल असून त्यांच्या घरी राजू पाटोळे (रा. ढवन वस्ती सावेडी) हा नोकर काही काळापासून कामास होता. फेब्रुवारी 2025 मध्ये फिर्यादी यांच्या घरातून दहा तोळ्याचे सोन्याचे गंठण गायब झाले होते. त्यावेळी पुरावा नसल्याने व शंका असतानाही फिर्यादीच्या कुटुंबीयाने नोकराकडे दुर्लक्ष केले होते. या घटनेनंतर पाटोळे हा घरातील हॉटेलचे काम सोडून निघून गेला. त्यानंतर 21 जूनपासून राजू पुन्हा हॉटेलवर व घरातील साफसफाई चे काम करण्यास आला व त्याने नेहमीप्रमाणे फिर्यादी यांची आजी कलावती बोरुडे यांची सेवा करण्याचे काम सुरु केले. 24 जुलै रोजी फिर्यादीची आजी यांनी त्यांच्या आत्यांना फोन करून दोन लाख रुपयांची मागणी केली व कोणास काही सांगू नका असेही दोघींना सांगितले.
त्यावर आजींनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर आपण थोडे थोडे करून पैसे देऊ असे आजी म्हटल्याने तुम्ही कोणाला काही सांगू नका, आपण हे प्रकरण मिटवून टाकू असे पाटोळे यांनी सांगितले आणि तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपये द्यावे लागतील, अशी भीती दाखवून खंडणीची मागणी केली व एका अनोळखी माणसाला फोन करून आजी सोबत बोलावयास लावले. ही माहिती मिळाल्याने फिर्यादी यांनी आजीचे फोनवर पाहिले असता आजीच्या फोनवर राजू पाटोळे यांनी अनेक वेळा फोन केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वैभव बोरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटोळे यांच्याविरुद्ध खंडणीची मागणी आणि घरातील दहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रमिला गायकवाड करीत आहेत.




