धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील देवपूरात भागातील वाडीभोकर रोड व दत्त मंदिर परिसरातील सात कॅफेंवर आज देवपूर पोलिस पथकाने छापा टाकला. त्यात पाच ठिकाणी महाविद्यालयीन तरूण-तरूणी गैरकृत्य करतांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेत पालकांसमोर समज देवून सोडण्यात आले. तर कॅफे चालकांसह इतर नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
भावी पती-पत्नीही आढळले : दरम्यान, तरूण-तरूणींमध्ये साखरपुडा झालेल्या भावी पती-पत्नीचा समावेश आढळून आला. पंरतू सुरत येथील भावी नवरदेव धुळ्यातील आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी आला होता. दोघेजण नेमके त्याच कॅफेत भेटले आणि पोलिसांचीही कारवाई झाल्याने त्यांनाही ताब्यात घेत देवपूर पोलिस ठाण्यात आणले. प्रसंगी त्यांच्या पालकांना पोलिसांनी दोघांचे लग्न लवकर उरकून टाका, असा सल्ला दिल्याने एकच हशा पिकला.
शहरातील देवपूर भागातील महाविद्यालय परिसरातील काही कॅफेंमध्ये तरुण-तरूणींना अश्लिल चाळे करण्यासाठी कॅफे चालक जागा उपलब्ध करून देत, असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनी वेगवेगळी पथके तयार करून सात कॅफेवर अचानक छापा टाकत तपासणी केली. त्यात पाच ठिकाणी तरूण-तरूणी गैरकृत्य करतांना आढळून आले. या कॅफेमध्ये कम्पार्टमेंट केलेले होते. सुमारे 15 तरूण व 15 तरूणी तसेच कॅफे चालकांसह नऊ जणांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पालकांना कळविण्यात आले. या कारवाईनंतर देवपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर एकच गर्दी झाली होती. दरम्यान तरूण-तरूणींना पालकांसमोर समज देवून सोडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधिक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, सपोनि सचिन बेंद्रे, महिला पोसई सी. जे. शिरसाठ, इंदवे, पोहेकाँ कचवे, विजय जाधव, पोना देवरे, वाघ, साळवे, थोरात, धोबी, खाटिक यांच्या पथकाने केली.