Wednesday, December 4, 2024
Homeशब्दगंधपंच्याहत्तरीनंतरची आव्हाने

पंच्याहत्तरीनंतरची आव्हाने

भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची 24 वर्षे म्हणजे 1971 पर्यंत आपण चार पारंपरिक युद्धे लढलो. 2014 नंतर नवीन युद्ध सुरू झाले ज्याला अनरिस्टिकटेड वॉर/हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. हायब्रीड युद्धात प्रत्येक भारतीय फ्रंट लाईन सैनिक आहे. प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

सध्या चीनचे भारताविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध चाललेले आहे. त्याला हायब्रीड वॉर, झोन वॉर फेअर किंवा अनरिस्टिकटेड वॉर किंवा अनियमित युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध 365 दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरांवरती लढले जाते.

- Advertisement -

पारंपरिक युद्धाचे आव्हान

भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची 24 वर्षे म्हणजे 1971 पर्यंत आपण चार पारंपरिक युद्धे लढलो. 1947 मध्ये पाकिस्तानशी एक वर्ष संघर्ष चालला. दुसरे पारंपरिक युद्ध चार आठवडे चीनशी 1962 साली झाले. तिसरे युद्ध 1965 साली चार आठवडे पाकिस्तानशी झाले. शेवटचे पारंपरिक युद्ध तीन आठवडे 1971 साली झाले.

काराकोरम युद्धाचे तीन भाग

1971 सालचे युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळाले की, पारंपरिक युद्धात भारताशी लढून जिंकणे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचे युद्ध 1972 नंतर सुरू केले. ज्याचे नाव होते ‘ऑपरेशन काराकोरम’. काराकोरम युद्धाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खलिस्तानी दहशतवाद, काराकोरम दोन म्हणजे कश्मीरमध्ये छुपे युद्ध किंवा दहशतवाद आणि काराकोरम तीन म्हणजे देशाच्या इतर भागात दहशतवाद.

‘ऑपरेशन काराकोरम’ची परिस्थिती

अफू, गांजा, चरसचा दहशतवाद (नार्को टेररिझम) पंजाब आणि सीमावर्ती भागात सुरू आहे. या युवकांना जर वाचवायचे असेल तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सीमा सील कराव्या लागतील. राजकीय पक्ष, पोलीस, सामाजिक संस्था आणि समाज यांना अफू, गांजा, चरस दहशतवादाच्या लढाईमध्ये एकत्रित लढावे लागेल. काश्मीरच्या खोर्‍यामध्ये आजही दहशतवादी आहेत. भारतीय सैन्य अविरत ऑपरेशन्स लाँच करत असते.

भारताच्या इतर भागात दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे. मात्र समुद्राकडून तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि बांगलादेशी घुसखोरी सुरू आहे. नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलिसांना डोळ्यात तेल घालून सागरी सुरक्षा मजबूत करावी लागेल. माओवाद संपवण्याकरता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबूजमाड जंगल आणि सरंदा जंगलांमध्ये घुसून माओवाद्यांचे ट्रेनिंग, इतर कॅम्प आक्रमक कारवाई करून उद्ध्वस्त करावे लागतील.

बाह्य सुरक्षेची आव्हाने

सीमेवर पाकिस्तान दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न करतो. याला आपण चांगले प्रत्युत्तर देत आहोत. भारताने चीनला लडाखमध्ये चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. गलवानच्या लढाईमध्ये आपण चीनपेक्षा चांगली बाजी मारली. चीनने 5 मे 2020 रोजी अतिक्रमण केले. चीन पाच जागांपैकी तीन जागांपासून परत गेला आहे, मात्र डेपसांगमधून परत जायला तयार नाही. विविध प्रकारे दबाव टाकून चीनला मागे ढकलण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. चीनबरोबरची चिंता आहे ती 365 दिवस चालणार्‍या हायब्रीड वॉरची.

हायब्रीड वॉर

2014 नंतर नवीन युद्ध सुरू झाले ज्याला अनरिस्टिकटेड वॉर/हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रीड वॉर फेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो.

आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध

चीनने भारतात केलेली आर्थिक घुसखोरी, भारताशी चाललेले आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध हा एक महत्त्वाचा आयाम आहे. आर्थिक युद्ध लढण्याकरता आपण आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये झालेली घुसखोरी कमी करत आहोत. ‘मेक इन इंडिया’ला महत्त्व देऊन चीनमधून येणार्‍या गोष्टी भारतात बनवत आहोत, बनवणार आहोत. मात्र ही लढाई अनेक वर्षे चालणार आहे. याकरता भारतीय उद्योग क्षेत्राला जागतिक दर्जाचे बनण्यासाठी मेहनत करावी लागेल.

मानसिक युद्ध, प्रोपोगंडा वॉर

मानसिक युद्ध, प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्ध सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युद्ध कसे जिंकायचे? त्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये.

सायबर युद्ध

चीन आपल्यासोबत सायबर युद्ध लढत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईतील इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती झालेला हल्ला. सायबर युद्ध जिंकण्याकरता आपल्याला देशाची सायबर यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल.

हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर

स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु ‘हायब्रीड ऑपरेशन्स’ आपणसुद्धा चीन, पाकिस्तानमध्ये करू शकतो. पारंपरिक युद्धामध्ये भारतीय सीमांचे रक्षण करण्याकरता भारतीय सैन्य नक्कीच सक्षम आहे. मात्र हायब्रीड युद्धाच्या विविध प्रकारांमध्ये चीन भारताच्या पुष्कळच पुढे आहे. म्हणून हायब्रीड युद्धाच्या प्रत्येक प्रकारच्या लढाईमध्ये प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारताला निर्माण करावी लागेल.

हायब्रीड युद्धात प्रत्येक भारतीय फ्रंट लाईन सैनिक आहे. प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या