Sunday, May 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकोट्यवधी रुपये खर्चूनही गटारीचे पाणी गोदावरीत

कोट्यवधी रुपये खर्चूनही गटारीचे पाणी गोदावरीत

स्मार्ट सिटीच्या कामाचा बुरखा फाटला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी मिशनच्या लाखो रुपयांच्या कामांनंतरही गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी मिसळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा मागमूस नसताना देखील चेंबरमधून सांडपाणी उफाळून थेट रामकुंडात मिसळत असल्याने गोदावरीचे पावन स्वरूप ढासळल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक संघटना, नेते आणि नागरिक सातत्याने आवाज उठवत असले तरी प्रत्यक्षात कामाचा अभाव दिसतो. केवळ घोषणाबाजी करून गोदावरीला स्वच्छ करता येणार नाही, तर संबंधित प्रशासनाला खडबडून जागे करणे आवश्यक असल्याचे मत गोदाप्रेमींनी व्यक्त केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गोदावरी नदीपात्रात थेट गटारीचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे पाणी मलजल शुद्धीकरण केंद्रात (एसटीपी) वळवले पाहिजे, ही बाब प्रशासनाला ज्ञात असूनही ढिसाळ नियोजनामुळे सांडपाणी थेट नदीतच मिसळत आहे. परिणामी नदीतील पाणवेली वाढल्या असून पाण्याची गुणवत्ता गंभीर स्वरूपात घसरली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 12 कोटी रुपयांचा खर्च करून गोदावरी घाट परिसरातील ड्रेनेज यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र हे काम केवळ 6 महिन्यांतच अपयशी ठरल्याचे शनिवारी लक्ष्मण कुंड येथे चेंबर ओव्हरफ्लो झाल्यानंतर स्पष्ट झाले. सांडपाणी थेट लक्ष्मण कुंड, धनुष कुंड आणि रामकुंडात मिसळले गेले आणि परिसरात दुर्गंधी पसरली.

या प्रकरणानंतर गोदाप्रेमींनी मनपा अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्वरित सक्शन व्हॅनच्या साहाय्याने चेंबर स्वच्छ केले. यावेळी देवांग जानी, कृष्णकांत नेरकर आणि मनपाचे आरोग्य अधिकारी संजय दराडे उपस्थित होते.

याबाबत महापालिकेच्या घनकचरा तसेच आरोग्य विभागाला विचारणा केल्यावर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. माहिती दिल्यावर सफाई कर्मचारी पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील घाण, कचर्‍याबाबत महापालिका पाहिजे तशी अ‍ॅक्टिव्ह नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

गोदावरीचे प्रदूषण हा केवळ काही जणांचा विषय नसून संपूर्ण नाशिककरांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटी आणि महापालिकेवर दबाव टाकण्याची गरज आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे.
– देवांग जानी, गोदाप्रेमी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update 2025 : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल; कसा असणार...

0
मुंबई | Mumbai  देशभरात आतुरतेने वाट पाहिला जाणाऱ्या मोसमी पावसाने (Monsoon Update) यंदा वेळेआधीच केरळमध्ये (Keral) दाखल होऊन एक सुखद धक्का दिला होता. भारतीय हवामान...