Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : क्रिकेट जिंकले!

शब्दगंध : क्रिकेट जिंकले!

कोणताही खेळ वा स्पर्धा म्हटली की, त्यात हार-जित अटळ असते. दोन संघांपैकी कोणीतरी जिंकणारच असतो. क्रिकेटमध्ये (Cricket) तर काहीही होऊ शकते. गेल्या विश्‍वचषक स्पर्धेचा विजेता असलेल्या इंग्लंड संघाची यावेळच्या स्पर्धेत केविलवाणी अवस्था झाली. गुणतालिकेत इंग्लंडची सातव्या तर श्रीलंकेची नवव्या स्थानावर घसरण झाली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने भारतीय संघाचा पराभव करून विजयाचा ‘षटकार’ मारला. अहमदाबादेत कोण जिंकले? कोण पराभूत झाले? यापेक्षा ‘क्रिकेट जिंकले’ हे जास्त महत्त्वाचे!

यंदाची विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात खेळवली गेली. गेले दीड महिना ही विश्‍वचषक स्पर्धा रंगली. यजमान भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमी चौकार-षटकारांच्या आतषबाजीत रममाण झाले होते. भारतीय संघाच्या सामन्यांना मैदाने प्रेक्षकांनी खच्चून भरली होती. तरीसुद्धा हल्ली क्रिकेट स्पर्धांचे प्रमाण जरा जास्तच वाढल्याचे जाणवते. एक स्पर्धा संपते न संपते तोच दुसरी स्पर्धा सुरू होते.खेळाडूंना आणि पाहणार्‍यांनाही पुरेशी उसंत मिळत नाही. क्रिकेटप्रेमींनाही क्रिकेटचा अतिरेक जाणवू लागला असावा. त्यांना पूर्वीसारखे क्रिकेटचे अप्रूप राहिलेले नसावे. त्यामुळेच की काय; यावेळच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

- Advertisement -

मायभूमीवर विश्‍वचषक (World Cup) स्पर्धा होणार म्हटल्यावर ही स्पर्धा भारतानेच जिंकावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमींना होती. स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी कशी होणार? याबाबत सुरुवातीला कोणालाच अंदाज नव्हता. स्पर्धेचे साखळी फेरीतील सामने सुरू झाले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात एकेक करता दहा साखळी सामने आणि उपांत्य फेरीचा सामना जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील उमदी कामगिरी पाहता अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर मात करून विश्‍वचषक जिंकणार, याबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमी आश्‍वस्त होते. विश्‍वचषक जिंकण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर मानसिक दडपण वाढले. चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे खेळाडूंवर लादले गेले.

अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबादमध्ये सव्वा लाखावर आसन क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी मैदानावर झाला. मैदान प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. भारतीय संघाच्या  विजयी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदीसुद्धा मैदानावर मौजूद होते. त्यामुळे तर हा सामना जिंकावाच लागेल, या कल्पनेने भारतीय संघाचे दडपण आणखी वाढले. अपेक्षांचे अवजड ओझे आणि दडपणाखाली भारतीय संघ मैदानात उतरला. सामन्यात नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असल्याचे क्रिकेट जाणकारांकडून वारंवार सांगितले जात होते. दुर्दैवाने कर्णधार रोहितने नाणेफेक गमावली. त्यानंतर काय घडले ते सर्वांनीच छोट्या पडद्यावर पाहिले.

स्पर्धेत सलग दहा सामने जिंकणार्‍या भारतीय फलंदाजांना अंतिम सामन्यात सूर गवसलाच  नाही. धुव्वाधार फलंदाजी करून रोहित शर्मा खणखणीत शतक झळकावून संघाच्या विजयाचा  मजबूत पाया रचेल, विराट कोहली एक्कावन्नावे शतक ठोकून त्यावर कळस चढवेल, इतर खेळाडू भारताला मोठी धावसंख्या उभारून देतील व ऑस्ट्रेलियापुढे तगडे आव्हान उभे करतील, असे प्रत्येक चाहत्याला वाटत होते. प्रत्यक्षात विपरीत घडत गेले. पाहता-पाहता भारताचे खंदे फलंदाज बाद होत गेले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. भारतीय संघाचा डाव 240 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने हा सामना रुबाबात जिंकला.

अंतिम सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाल्याने फक्त भारतीय रसिकच नाउमेद झाले असे नाही तर स्पर्धेत जिगरबाज खेळ्या करून रसिकांच्या अपेक्षा उंचावणारे खेळाडू देखील भावूक झाल्याचे दिसले. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आदी खेळाडूंना अश्रू अनावर झाले. विश्‍वचषकाचे स्वप्न साकार झाले नाही म्हणून भारतीय रसिक हळहळले, पण त्याबद्दल खेळाडूंना दोष न देता सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. क्रिकेटप्रेमींची  खिलाडू वृत्ती यातून दिसली. सामना संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला.भारतीय संघ विश्‍वचषक जिंकला असता तर विजेत्यांचे जल्लोषात स्वागत झाले असते. वाजत-गाजत मिरवणूक काढली गेली असती. देशभर फटाक्यांची आतषबाजी होऊन पुन्हा दिवाळी साजरी झाली असती, पण तसे झाले नाही.

भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणार्‍या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीचेही कौतुक झाले पाहिजे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील सर्व सामने जिंकून त्यांनी अंतिम फेरी गाठली. विश्‍वचषक जिंकण्याच्या जिद्दीने ते खेळले आणि यशस्वी झाले. तथापि मायदेशी परतलेल्या जगज्जेत्यांचे तेथे थंडे स्वागत झाल्याच्या बातम्या सिडनीतून आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी उसळली नाही. कदाचित सतत जिंकणार्‍या संघाचे देशवासियांना फारसे कौतुक वाटत नसावे. याउलट उपविजेता भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजेशाही थाटात अंतिम फेरी गाठणार्‍या भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. क्रिकेटचा भरभरून आनंद दिला. त्याबद्दल चाहते समाधानी असतील. क्रिकेटप्रेमींची ही सकारात्मक भूमिका भारतीय संघाला आगामी काळात नवा हुरूप देणारी ठरेल.

कोणताही खेळ वा स्पर्धा म्हटली की, त्यात हार-जित अटळ असते. कोणीतरी जिंकणारच असतो. एक संघ पराभूत झाला म्हणूनच दुसर्‍या संघाला विजयाचा आनंद मिळतो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. गेल्या विश्‍वचषक स्पर्धेचा विजेता असलेल्या इंग्लंड संघाची यावेळच्या स्पर्धेत केविलवाणी अवस्था झाली. गुणतालिकेत इंग्लंड सातव्या तर श्रीलंका नवव्या स्थानावर राहिली. अहमदाबादेत कोण जिंकले? आणि कोण पराभूत झाले? यापेक्षा ‘क्रिकेट जिंकले’ हे जास्त महत्त्वाचे!

- Advertisment -

ताज्या बातम्या