Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : ‘अवकाळी’चा फेरा

शब्दगंध : ‘अवकाळी’चा फेरा

सलग दोन-तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) उभ्या पिकांची माती केली. दुष्काळात होरपळणार्‍या महाराष्ट्रावर (Maharashtra) अवकाळी आणि जोरदार गारपिटीने जणू आभाळच कोसळले. शेत-शिवारांत, द्राक्षबागांत, बांधांवर, रस्त्यावर सर्वत्र गारांचा खच जमला. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांची डोळ्यांदेखत माती झाल्याचे शेतकर्‍यांना पाहावे लागले. आधी मोसमी पावसाने (Rain) बरसण्यात हयगय केली. आता अवकाळी बनून त्याने कशाबशा आलेल्या पिकांची माती केली आहे.

पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर ते मार्च-एप्रिलदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची संकटे ठरलेली आहेत. अलीकडच्या काळात निसर्गाचा तो शिरस्ताच बनला आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला. गेल्या रविवारी आकाशात अचानक अवकाळी ढगांनी दाटी केली. पाहता-पाहता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. सलग दोन ते तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकांची माती केली. दुष्काळात होरपळणार्‍या महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने जणू आभाळच कोसळले. शेत-शिवारांत, द्राक्षबागांत, बांधांवर, रस्त्यावर सर्वत्र गारांचा खच जमला. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांची डोळ्यांदेखत माती झाल्याचे शेतकर्‍यांना पाहावे लागले. आधी मोसमी पावसाने बरसण्यात हयगय केली. आता अवकाळी बनून त्याने कशाबशा आलेल्या पिकांची माती केली आहे.

- Advertisement -

सरकारी अंदाजानुसार 22 जिल्ह्यांतील 4 लाख हेक्टरातील शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला, आंबा, संत्री आदी सर्वच पिकांची वेगवेगळ्या विभागात धूळधाण झाली. नाशिक जिल्हा ‘द्राक्षपंढरी’ म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात 11 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्षबागा भुईसपाट झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात सुमारे 33 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळी व गारपिटीचा फटका बसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. वादळी पाऊस आणि गारांच्या मार्‍याने द्राक्षबागा झोडपून निघाल्या. मण्यांची फूट झाली. काही ठिकाणी पानांसोबत घडही गळून पडले. काही बागा भुईसपाट झाल्या. काही ठिकाणी तर बागांचा फक्त सांगाडाच उरल्याचे दिसत आहे. कापणी होऊन शेतात ठेवलेल्या पिकांचा चिखल झाला. दुष्काळामुळे ग्रामीण भागात दिवाळी सणावर निराशेचे सावट होते. दुष्काळाचा सामना कसा करायचा? या चिंतेत शेतकरी असतानाच दिवाळीनंतर ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात तसा ‘दुष्काळात अवकाळी फेरा’ आला. त्यात शेतीत होत्याचे नव्हते झाले.

अपुर्‍या पावसामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने दुष्काळ जाहीर करण्याचे धोरण अवलंबले आहे. आधीच्या नैसर्गिक हानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा अनेक शेतकर्‍यांना आहे. ती भरपाई मिळण्याआधीच दुसरे अस्मानी संकट बळीराजावर कोसळले. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अथवा अवकाळीचे संकट शेतीवर कोसळल्यावर नुकसान पाहणी करण्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू होतात. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली जाते. आताही तेच चित्र पाहावयास मिळत आहे. सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेसुद्धा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधांवर पोहोचत आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला होता. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्यापही मिळू शकलेली नसल्याचा आश्‍चर्यकारक प्रकार आताच्या अवकाळीनिमित्त उजेडात आला आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांना जानेवारी 2021 आणि ऑक्टोबर 2022 मधील अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा आहे.

आताच्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना देताना लालफितीचा कारभार आड येणार नाही याबाबत सरकारला दक्षता घ्यावी लागेल.अवकाळीने शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा केला आहे. अस्मानी संकटाने शेतकरी आधीच हैराण झाले असताना मंत्री आणि नेत्यांच्या कोरड्या आश्‍वासनांनी ते संतप्त होत आहेत. निफाड तालुक्यातील काही भागांना काही मंत्र्यांनी नुकत्याच भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकर्‍यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ‘आमच्या द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. आम्हाला शंभर टक्के मदत करा, अथवा आत्महत्येस परवानगी द्या’ अशा शब्दांत महिला शेतकर्‍यांनी आपल्या वेदना मांडल्या. ‘अभ्यास करतो, समिती नेमतो, असे काही सांगू नका! ते ऐकून आम्ही वैतागलो आहोत. नुकसान भरपाई देणार असाल तर सांगा, नाही तर रामराम!’ अशा परखड शब्दांत एका त्रस्त शेतकर्‍याने मंत्र्यांना सुनावले. राज्यातील अवकाळीग्रस्त लाखो शेतकर्‍यांच्या भावना यापेक्षा वेगळ्या नसतील.

अवकाळीच्या फेर्‍यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतीच्या नुकसानीवर चर्चा होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे चर्चा होऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत तातडीने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल आणि कृषी विभागाने मिळून एकत्रितपणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवड्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. त्या अधिवेशनात मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरात लवकर मदत कशी मिळेल याबाबत सरकार दक्षता घेईल, अशी आशा नुकसानीने खचलेल्या शेतकर्‍यांना असेल. तथापि मदत देताना अटी-नियमांचे जंजाळ त्याआड उभे राहणार नाही याचीही काळजी सरकारला घ्यावी लागेल. तरच अवकाळी-गारपीटग्रस्त बळीराजाला वेळेवर मदत आणि दिलासा मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या