एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत असे म्हणतात, पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार गटाचा समावेश झाला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपचे मंत्री, नेते तसेच कार्यकर्त्यांना नव्या गटातील मंत्री व नेत्यांशी जुळवून घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. ‘एका म्यानात दोन नव्हे तर तीन-तीन तलवारी’ असे गंमतीशीर चित्र सरकारमध्ये पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून राजकीय मोडतोड आणि तडजोडीचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. 2019 ला शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आली. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट-भाजप युतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाला. जनहिताचा कोणताही विचार नसलेल्या व नैतिकतेला तिलांजली देऊन स्वहिताला प्राधान्य देणार्या अशा राजकीय कसरती सुरू असाव्यात. राजकीय भेसळीने महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे गढूळले आहे. जनतेला उद्विग्न करणारा हा प्रकार आहे.
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत असे म्हणतात, पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार गटाचा समावेश झाला आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपचे मंत्री, नेते-कार्यकर्त्यांना नव्या गटातील मंत्री व नेत्यांशी जुळवून घ्यावे लागेल. ‘एका म्यानात दोन नव्हे तर तीन-तीन तलवारी’ असे गंमतीशीर चित्र सरकारमध्ये पाहावयास मिळत आहे. ज्यांच्याविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या, टीकेची झोड उठवली त्यांच्याच सोबत राहण्याची नामुष्की भाजप-शिंदे गटावर ओढवली आहे. शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत असताना अजित पवारांनी शिंदेंचाच कित्ता गिरवला. सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या आठ सोबत्यांना मंत्रिपदे देण्यात आली. ‘मला मुख्यमंत्री व्हायचे आहे’ असे अजितदादांनी जाहीरपणे सांगितल्याने मुख्यमंत्री शिंदे चपापले असतील. सत्तापदांच्या लाभार्थी राष्ट्रवादी नेत्यांना एका रात्रीत नवा साक्षात्कार झाला. राष्ट्रवादीची विचारधारा सोडून त्यांनी मोदींचे गोडवे गायला सुरुवात केली आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच खरे आव्हान आपल्यापुढे असेल याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांत फूट पाडून आघाडीची ताकद घटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी भाजपला एकेक मतदारसंघ टिकवणे महत्त्वाचे ठरणार आहे. 45पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी अजितदादांसारखा हुकमी एक्का सोबत असावा, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना वाटत असावे. म्हणून शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवेळी राष्ट्रवादीत फूट पाडली गेली असेल. महाविकास आघाडीसाठी हा धक्का किती मोठा आहे ते लगेच समजणार नाही. एक डाव भाजपने खेळला आहे. पुढची खेळी खेळण्याची बारी शरद पवारांची आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात राष्ट्रीयपातळीवर विरोधी पक्षांची आघाडी जुळवण्याच्या प्रयत्नांत पवार आघाडीवर आहेत. त्या पवारांनाच लक्ष्य करायचे, त्यांच्या पक्षात फूट पाडून त्यांचे लक्ष विचलित करायचे व त्यांना महाराष्ट्रातच गुंतवून ठेवायचे, अशी काही खेळी यामागे असू शकते.
अजित पवार गटाचा सरकारमध्ये अचानक प्रवेश झाल्याने शिंदे गटाची मात्र चांगलीच कोंडी झालेली दिसते. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून मंत्रिपदांची उत्कंठेने वाट पाहत असताना प्रत्यक्षात वेगळेच घडले. मागून आलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ‘शरद पवारांची विश्वासू माणसे’ म्हणवल्या जाणार्या पहिल्या फळीतील नेत्यांनीच वेगळा मार्ग पत्करला. तरीसुद्धा शरद पवार डगमगलेले नाहीत. गेली 50 वर्षे राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिले आहेत. पक्षफूट त्यांना नवी नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिकूल राजकीय परिस्थिती असताना पवार यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. पक्षाची प्रचारधुरा एकहाती सांभाळून 54 आमदार निवडून आणले होते. आताही त्याच निर्धाराने राज्याचा दौरा करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ‘आपला जनतेवर विश्वास आहे, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, तेथे न्याय मागू’ असा निर्धार पवार यांनी कराडमध्ये व्यक्त केला. कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन व त्यांना अभिवादन करून पवार यांनी राज्यव्यापी दौर्याची सुरुवात केली. यावेळी कार्यकर्ते आणि जनतेचा त्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. भाजपसोबत सत्तेत जाऊन बसलेल्या नेत्यांचे डोळे दीपवणारा होता.
प्रत्येक राजकीय पक्षाचा विशिष्ट जनाधार असतो. पक्षाची ध्येय-धोरणे व विचार लक्षात घेऊन मतदार मतदान करतात. त्यानंतर निवडून दिलेले आमदार-खासदार सोयीच्या राजकारणासाठी पक्ष बदलतात किंवा बंडखोरी करतात. लोकप्रतिनिधींची ही संधिसाधूवृत्ती मतदारांना कशी रुचणार? पक्षावर, नेत्यांवर निष्ठा बाळगणारे, त्यांचा उदोउदो करणारे कार्यकर्ते व मतदारांची त्यामुळे कुचंबणा होत असेल. जे कारण देत शिंदे गट शिवसेनेतून फुटला; त्याच अजित पवारांसोबत काम करण्याची विचित्र वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजपच्या खेळीने शिंदे गटाची कोंडी झाल्याने ठाकरे गट सुखावला असेल. भाजपच्या लेखी आपले महत्त्व कमी झाल्याच्या जाणिवेने शिंदे गटाची अस्वस्थता वाढणे साहजिक आहे, पण परतीचे दोर कापले गेले आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या वर्षभरात जे-जे घडले ते-ते सर्व सगळे राष्ट्रवादीच्या बाबतीत घडत आहे. ‘शिवसेना कोणाची?’ या प्रश्नावर वर्षभर खल झाला. त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीबाबत होऊ घातली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षासह पक्षचिन्हावर दावा सांगून निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. राष्ट्रवादीचे फूट प्रकरणदेखील कोर्ट-कचेरीच्या मार्गाने जाण्याची चिन्हे आहेत. निवडणुका आल्यावर महाराष्ट्रातील मतदार खरा न्याय करील. तेव्हा मात्र भल्या-भल्यांना हादरे बसतील.