Monday, November 25, 2024
Homeब्लॉगवेग की सुरक्षा? प्राधान्य कशाला?

वेग की सुरक्षा? प्राधान्य कशाला?

हल्ली निवडक मार्गांवर वेगवान, अतिवेगवान रेल्वेगाड्या सुरू करण्याचा अट्टाहास केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त साधून ‘वंदे भारत’ नावाच्या आधुनिक वेगवान रेल्वेगाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत. वेगवान गाड्या सुरू केल्या जात असल्या तरी त्यासाठी आपल्याकडील रेल्वेमार्ग तेवढे सक्षम आहेत का? पायाभूत सुविधा मजबूत आहे का? मुख्य म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचे? वेगाला की सुरक्षेला? याचाही विचार होणे आवश्यक आहे…

गेल्या शुक्रवारी ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये तिहेरी रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीवर जाऊन आदळली. त्या जोरदार अपघाताने कोरोमंडलचे काही डबे दुसर्‍या रेल्वेमार्गावरून जाणार्‍या यशवंतपूर एक्स्प्रेसवर आदळले. या अपघातात 288 प्रवासी मृत्युमुखी पडले. एक हजार प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेने फक्त रेल्वे प्रशासनच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. बालसोर अपघाताची देशभर चर्चा सुरू आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब रेल्वेत केला जात असतानासुद्धा हा अपघात कसा घडला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रवासी गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्त पुन्हा चर्चेत आला आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

रेल्वेगाड्यांचे छोटे-मोठे अपघात देशात कुठे ना कुठे घडतच असतात. प्रवासी गाडी अथवा मालगाडी रुळावरून घसरण्यापासून दोन गाड्यांची धडक होण्यापर्यंतचे अनेक अपघात रेल्वेच्या इतिहासात घडले आहेत. अपघात घडू नयेत म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जाते, असा दावा रेल्वेकडून केला जातो. तरीसुद्धा अपघात घडतातच. अपघात होऊच नयेत यासाठी रेल्वेने आता ‘सुरक्षा कवच’ नावाची नवी सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे.

लाल सिग्नल पार करण्यापासून गाडी वाचवण्यासाठी आणि रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी असल्याचे बोलले जाते. काही कारणाने इंजिनचालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही तर सुरक्षा कवच यंत्रणा गाडीची ब्रेक यंत्रणा कार्यरत करते, असेही सांगितले जाते. दोन गाड्या समोरासमोर आल्या तर त्यांची संभाव्य धडक टाळण्यासाठीदेखील ही यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जातो. असे असेल तर मग बालासोरमधील कोरेमंडल एक्स्प्रेससह तिहेरी अपघात कसा घडला? या प्रश्नाचे उत्तर आता रेल्वेनेच जाहीर केले आहे. या मार्गावर ‘सुरक्षा कवच’ कार्यरत नव्हते, असे सांगितले गेले आहे.

कारकीर्दीचे दीड शतक पूर्ण करून द्विशतकाच्या दिशेने आगेकूच करणार्‍या भारतीय रेल्वेने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीचा जलद व सुरक्षित मार्ग म्हणून रेल्वेने आपली उपयुक्तता तसेच विश्वासार्हता सिद्ध केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व सुखद ठरतो याचा अनुभव कोट्यवधी प्रवासी वर्षानुवर्षे घेत आहेत. दररोज सुमारे अडीच कोटी प्रवासी याच विश्वासाने रेल्वेने प्रवास करतात. सुरक्षेची हमी असलेल्या रेल्वेला प्रथम पसंती देतात.

भारतीय रेल्वेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. अनेक रेल्वेमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वात रेल्वेची जडणघडण झाली आहे. रेल्वेच्या प्रगतीसोबतच तिच्या आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या केंद्र सरकारने व रेल्वे मंडळाने रेल्वेला बदलत्या काळासोबत आधुनिक स्वरूप देण्यासाठी अनेक योजना आणल्या. अनेक उपक्रम राबवले. रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण, स्थानकांवर प्रगत सुविधा, ऑनलाईन तिकीट आरक्षण, प्रवाशांसाठी सरकते जिने, तिकीट व्हेंडिंग यंत्र आदी गोष्टी मोठ्या स्थानकांवर आढळतात. रेल्वेगाड्यांच्या दैनंदिन संचलनात आणि सिग्नल यंत्रणेतदेखील आधुनिक तंत्र अवलंबले जात आहे. मुंबई महानगरात उपनगरी रेल्वेगाड्यांची सततची वेगवान सेवा अचंबित करणारी आहे.

देशात 68 हजार किलोमीटरपेक्षा जास्त मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. त्यापैकी फक्त दक्षिण-मध्य रेल्वेच्या सुमारे 1500 किलोमीटर रेल्वेमार्गावरच ‘सुरक्षा कवच’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. इतरत्र ती बसवली गेलेली नाही, असे आता उघड झाले आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा विभागातील 2951 किलोमीटर रेल्वेमार्गावर ही यंत्रणा बसवण्यासाठी कंत्राट निघाले असून ते 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जास्त वाहतूक असलेल्या 35 हजार किलोमीटर मार्गावर ‘सुरक्षा कवच’ बसवण्यास परवानगी मिळाल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही यंत्रणा सर्व मार्गांवर कार्यरत होण्यासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागेल? तोपर्यंत रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न आपसूकच उद्भवतो.

सुरक्षा कवच यंत्रणा खात्रीशीर असेल तर मग सर्वच रेल्वेमार्गांवर ही यंत्रणा एव्हाना जलदगतीने बसवायला प्राधान्य द्यायला हवे होते. ही यंत्रणा कार्यरत असती तर कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात टाळता आला असता. शेकडो प्रवाशांचे प्राणही वाचले असते. निदान या अपघातापासून तरी बोध घेऊन सर्व रेल्वेमार्गांवर ‘सुरक्षा कवच’ बसवण्याच्या दृष्टीने रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंडळाला केंद्र सरकारने निर्देश दिले पाहिजेत.

हल्ली निवडक मार्गांवर वेगवान, अतिवेगवान रेल्वेगाड्या सुरू करण्याचा अट्टाहास केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त साधून ‘वंदे भारत’ नावाच्या आधुनिक वेगवान रेल्वेगाड्या विविध मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत. वेगवान गाड्या सुरू करण्याचा आग्रह धरला जात असला तरी त्यासाठी आपल्याकडील रेल्वेमार्ग तेवढे सक्षम आहेत का? पायाभूत सुविधा मजबूत आहे का? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

‘वंदे भारत’ ताशी 180 किलोमीटर वेगाने धावू शकते. मात्र या गाड्या सध्या त्यांच्या वेग क्षमतेपेक्षा कमी वेगाने धावत आहेत, असे खुद्द रेल्वेकडूनच सांगण्यात आले आहे. आजच्या वेगवान युगात प्रवासी गाड्या अधिक वेगाने चालवून कमी वेळात प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न दिसतो. रेल्वेचा हा दृष्टिकोन गैर नसला तरी वेगवान गाड्यांसाठी रेल्वेमार्गांच्या सक्षमीकरणाला त्याआधी प्राधान्य देण्याची गरज आहे. रेल्वेमार्गांचे सक्षमीकरण झाल्यावर वेगवान गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा निर्धार कोणीही रोखू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या