देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. आताचे चित्र भाजपसाठी फारसे अनुकूल दिसत नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपपुढे अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. विरोधी पक्षांची महाआघाडी हे त्यापैकी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. विरोधकांच्या ऐक्याची खिल्ली उडवण्यात भाजप नेते समाधान मानत असले तरी पाटण्यातून एकजुटीच्या दिशेने सुरू झालेली विरोधी पक्षांची आगेकूच भाजपसाठी धोक्याची घंटा आहे…
गेला शुक्रवार क्रांतिकारी भूमी असलेल्या बिहारची राजधानी पाटणा आणि देशातील विरोधी पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस ठरला. त्याचे कारणही तसेच खास होते. जदयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची महाबैठक पाटण्यात बोलावली होती. विविध कारणांवरून परस्परांशी मतभेद आणि राजकीय तेढ पाहता किती पक्ष बैठकीनिमित्त एकत्र येतील? याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र मुरब्बी नेते नितीशकुमार यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षांच्या पहिल्याच बैठकीला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 15 प्रमुख पक्षांचे अध्यक्ष, नेते, पाच राज्यांचे मुख्यमंत्री, तेवढेच माजी मुख्यमंत्री हजर झाले. त्यामुळे सर्वच शंका-कुशंकांना पूर्णविराम मिळाला.
बैठकीस उपस्थित नेत्यांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजद नेते लालूप्रसाद यादव, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, आआपा संयोजक अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, भाकप नेते डी. राजा, माकप नेते सीताराम येचुरी आदींसह 27 नेत्यांचा समावेश होता. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाजप नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.
कोणी म्हणाले… ही बैठक फोटो काढण्यापुरती होती तर कोणी म्हणाले… बैठक विरोधकांची नव्हती; परिवारवाद्यांची होती. आणखी एका नेत्याने तर मोदींना हरवण्यासाठी ही बैठक होती की राहुल गांधींचे लग्न जमवण्यासाठी? अशा शब्दांत खिल्ली उडवली. आजारातून बरे झालेले लालूप्रसाद यादव विरोधकांच्या बैठकीनिमित्त प्रथमच माध्यमांना सामोरे गेले. त्यांनी बिहारी शैलीत राहुल गांधी यांचे कौतुक करताना ‘लग्न करा, आम्ही वर्हाडी म्हणून येऊ’, असा त्यांना दिलेला वडीलकीचा सल्ला सूचक होता. विरोधकांची एकजूट होत असताना राहुल यांनी आता नेतृत्वासाठी सज्ज व्हावे, असेच लालूप्रसादांना सूचित करायचे असावे, पण टीका करणार्या नेत्यांना ते कसे समजणार?
पाटण्यात जमून आलेली विरोधकांची एकजूट भाजपसाठी अनपेक्षित असावी. आपापल्या गृहराज्यांसोबतच राष्ट्रीय राजकारणात दबदबा राखून असलेल्या 15 पक्षांचे प्रमुख नेते मतभेद, हेवेदावे आणि मोठेपणा बाजूला ठेऊन प्रथमच एकत्र आले. कोणत्याही मानपानाची अपेक्षा न बाळगता एकमेकांशेजारी बसले. परस्परांशी संवाद साधला. बैठकीनंतर त्यांची प्रथमच संयुक्त पत्रकार परिषद झाली. जागावाटपात काँग्रेस लवचिकपणा दाखवेल, असे मोठे विधान राहुल गांधी यांनी केले.
याचा अर्थ लोकसभा निवडणुकीला इतर विरोधी पक्षांसोबत सामोरे जायचे काँग्रेस नेतृत्वाने निश्चित केलेले दिसते. भाजपविरोधात सुरुवातीला उघड भूमिका घेणारे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मात्र पाटण्याच्या बैठकीला हजर राहणे टाळले. तेलंगणात विधानसभा निवडणूक होऊ घातली असताना विरोधी पक्षांची महाआघाडी आणि भाजप अशा कात्रीत राव आणि त्यांचा पक्ष अडकण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे. विरोधी आघाडीपासून अंतर राखून ‘एकला चलो रे’चा मार्ग त्यांनी स्वीकारला असेल?
विरोधकांची एकजूट होणे केवळ अशक्य, तोवर आपल्या केंद्रसत्तेला धोका नाही, अशा भ्रमात वावरणार्या भाजपला पाटण्यातील विरोधी पक्षांच्या महाबैठकीने मोठा हादरा बसला आहे. त्यामुळेच की काय, आतापर्यंत अडगळीत टाकलेल्या मित्रपक्षांना पुन्हा चुचकारून सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. नाव घ्यावे असा एकही मोठा मित्रपक्ष आज भाजपसोबत नाही. फुटकळ पक्ष आणि गटांचाच भरणा सध्यातरी दिसतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून मित्रपक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात केला जाऊ शकतो.
देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी विविध नेते प्रयत्न करत आहेत. त्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. विरोधकांच्या महाआघाडीत पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. ही बाब भाजप नेतृत्वाच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळेच की काय, हल्ली पवार आणि त्यांच्या पक्षावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपासून राज्यपातळीवरचे नेते टीकेची झोड उठवत आहेत. केंद्रसत्तेत असलेल्या भाजप हाती स्वबळावरची गुजरात, आसाम अशी काही मोजकीच राज्ये उरली आहेत. गोवा, हरियाणा, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत दुसरे पक्ष सोबत घेऊन किंवा इतर पक्षांत फूट पाडून सत्ता मिळवली गेली आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांत भाजपच्या हातून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही दोन राज्ये निसटली आहेत. तेथे काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले आहे. केंद्रसत्तेत पुन्हा येण्याचा मनसुबा भाजपचे शीर्षस्थ नेते बाळगून आहेत, पण त्यासाठी विविध राज्यांत पक्षस्थिती मजबूत असणे आवश्यक आहे. देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. आताचे चित्र भाजपसाठी फारसे अनुकूल दिसत नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपपुढे अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. विरोधी पक्षांची महाआघाडी हे त्यापैकी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
विरोधकांतील आजवरची बेकीच भाजपला फायदेशीर ठरली आहे. आपापसात लढणार्या विरोधी पक्षांच्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला होत आला आहे. विरोधकांतील ही बेकी यापुढेही कायम राहावी असेच भाजपला वाटत असेल. मात्र आपल्यातील बेकीचा लाभ भाजपला होत असल्याची जाणीव बहुतेक प्रादेशिक पक्षांना आता झालेली असावी. ती चूक सुधारून एकजुटीने उभे राहायचे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर मात करायची, असा निर्धार एकमेकांचे कट्टर विरोधी असलेल्या पक्षांनी केलेला दिसतो. विरोधकांच्या ऐक्याची खिल्ली उडवण्यात भाजप नेते समाधान मानत असले तरी पाटण्यातून एकजुटीच्या दिशेने सुरू झालेली विरोधी पक्षांची आगेकूच भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.