Friday, November 22, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : काय सांगतात निकाल?

शब्दगंध : काय सांगतात निकाल?

कर्नाटकातील पराभवाचा धडा घेऊन भाजपने (BJP) पाचही राज्यांत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभी केली आणि राबवली. पंतप्रधान मोदींच्या चेहर्‍यावरच निवडणुका लढवल्या. मोदींच्या करिष्म्याने भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत तिहेरी विजय मिळवला. काँग्रेसने (Congress) कर्नाटकापाठोपाठ तेलंगणा राज्य जिंकून दक्षिणेत आपली ताकद आणखी वाढवली आहे. दहा वर्षे केंद्रसत्तेत असलेल्या भाजपला जे जमले नाही ते काम काँग्रेसने करून दाखवले, पण अतिआत्मविश्‍वासापायी राजस्थान आणि छत्तीसगड (Rajasthan and Chhattisgarh) ही उत्तरेकडील महत्त्वाची हातची राज्ये मात्र गमावली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या करिष्म्याने भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत तिहेरी विजय मिळवला. मध्य प्रदेशातील यश मोठे आहे. एवढे यश मिळेल, अशी भाजप नेत्यांनादेखील अपेक्षा नसेल. मोदींच्या एकहाती प्रचाराने भाजपचा विजय सुकर झाला. काँग्रेसने कर्नाटकापाठोपाठ (Karnataka) तेलंगणा राज्य जिंकून दक्षिणेत आपली ताकद आणखी वाढवली आहे. दहा वर्षे केंद्रसत्तेत असलेल्या भाजपला जे जमले नाही ते काम काँग्रेसने करून दाखवले, पण अतिआत्मविश्‍वासापायी राजस्थान आणि छत्तीसगड ही उत्तरेकडील महत्त्वाची हातची राज्ये मात्र गमावली. भाजपच्या घवघवीत यशाला विरोधी पक्षांमधील विसंवादाचा अप्रत्यक्ष हातभार लागला, हेही नजरेआड करता येणार नाही.

- Advertisement -

कर्नाटकातील पराभवाचा धडा घेऊन भाजपने पाचही राज्यांत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभी केली आणि राबवली. मोदींच्या चेहर्‍यावरच निवडणुका लढवल्या. मोदींच्या सभा आणि शोभायात्रांनी निवडणूक वातावरण बदलले. ‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा भाजपसाठी पुन्हा खरी ठरली आहे. आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी मोदींसह भाजपने आटोकाट प्रयत्न केले. त्याचाही फायदा भाजपला झाला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत एसटीच्या 101 जागा आहेत. त्यापैकी 53 जागा भाजपने जिंकल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही राज्यांत 42 जिल्ह्यांत प्रचारसभा घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून भाजपला 76 नव्या जागांवर विजय मिळाला. मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज आताच्या निकालांनी फोल ठरवले आहेत.

शब्दगंध : ‘अवकाळी’चा फेरा

तिन्ही राज्यांत भाजपला मिळालेल्या मतांचा टक्का वाढला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या मतदान टक्केवारीत मध्य प्रदेश वगळता इतर दोन राज्यांत फार मोठा फरक नाही. मध्य प्रदेशात भाजपला 48.55 टक्के तर काँग्रेसला 40.40 टक्के मते मिळाली. हा फरक 8.15 टक्के आहे. राजस्थानात भाजपला 41.69 टक्के तर काँग्रेसला 39.53 टक्के मते मिळाली. 2.16 टक्के फरकाने काँग्रेसच्या 31 जागा घटल्या. भाजपला पूर्वीपेक्षा 42 जागा जास्त मिळाल्या. छत्तीसगडमध्ये भाजपला 46.27 टक्के तर काँग्रेसला 42.23 टक्के मते मिळाली. दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीतील अंतर 4.04 आहे, पण त्या फरकाने भाजपच्या 39 जागा वाढल्या. याउलट काँग्रेसला 33 जागांचा तोटा झाला. तेलंगणात काँग्रेसला 39.40 टक्के तर बीआरएसला 37.35 टक्के मते मिळाली.

दोन्ही पक्षांतील मतांच्या टक्केवारीतील अंतर केवळ 2.05 टक्के आहे. तरीही काँग्रेसला जादा 45 जागांचा लाभ झाला. बीआरएसच्या 49 जागा घटून के. सी. राव यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकांतील तिहेरी विजयामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक पक्की झाली, असे त्यांना वाटत असेल, पण आताच्या विजयाने हुरळून जाऊन चालणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे ‘इंडिया’ आघाडीचे मोठे आव्हान असेल. प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये, असे जाणकार सांगतात. कधी-कधी अतिआत्मविश्‍वास नुकसानकारक ठरू शकतो. काँग्रेसने तो अनुभव नुकताच घेतला आहे.

शब्दगंध : हवा प्रदूषणाचे महासंकट!

इंडिया’ आघाडीत आपला वरचष्मा राहावा म्हणून पाच राज्यांच्या निकालांकडे काँग्रेसचे लक्ष होते असे म्हणतात, पण या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवल्या. समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, जनता दल संयुक्त (जदयू) या पक्षांनीही विधानसभा निवडणुका लढवल्या. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव मध्य प्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढवू इच्छित होते, पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नसावा. म्हणून अखिलेश यांनी तेथे 70 उमेदवार उभे केले. अरविंद केजरीवाल यांनीही तीन राज्यांत ‘आआपा’चे 200 उमेदवार उभे केले. जदयूनेदेखील काही उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. तथापि हे तिन्ही पक्ष निष्प्रभ ठरले. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. काँग्रेसने तिन्ही पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या असत्या तर कदाचित काँग्रेससह या पक्षांनासुद्धा काही प्रमाणात फायदा झाला असता.

तीन राज्यांतील पराभवाबद्दल ‘इंडिया’ आघाडीतील काही प्रमुख पक्षांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. एकमेकांवर दोषारोप अथवा शेरेबाजी न करता आपण आघाडीचे घटक आहोत, या भावनेने आपापसातील हेवेदावे आणि मतभेद विसरले पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न झाले तरच देशातील जनता आघाडीकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहू शकेल. विरोधी पक्षांनी आघाडी केली असली तरी त्यांच्यात अजून तरी पुरेसा सुसंवाद निर्माण झाल्याचे दिसत नाही. आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसला सामंजस्याची भूमिका घेऊन पुढे यावे लागेल. दुखावलेल्या नेत्यांची नाराजी दूर करावी लागेल. आघाडीत एकजूटही दिसायला हवी. तरच लोकसभा निवडणुकीला ‘इंडिया’ आघाडी सक्षमपणे सामोरी जाऊ शकेल.

शब्दगंध : क्रिकेट जिंकले!

तीन राज्ये जिंकल्याने भाजपला आभाळ ठेंगणे होणे साहजिक आहे, पण ‘उपांत्य फेरी’ जिंकली म्हणजे अंतिम फेरी जिंकता येईलच असे नाही. एकही सामना न गमावता भारतीय क्रिकेट संघ यावेळी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठ्या रुबाबात पोहोचला होता, पण अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींचेच नाव असलेल्या मैदानावर त्यांच्याच उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. काँग्रेसलाही तीन राज्यांत विजयाचा आत्मविश्‍वास होता, पण बाजी भाजपने मारली. शेवटी खेळ असो वा निवडणूक; दरवेळी नवे आव्हान समजून नव्याने तयारी करूनच मैदानात उतरावे लागते. जिंकण्याची हमी कोणीही देऊ शकत नाही. ‘इंडिया’ असो वा ‘एनडीए’; लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांना नव्या दमाने तयारी करावी लागेल. कारण लोकसभेची (Loksabha) वाट वाटते तितकी सोपी नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या