Monday, November 25, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : एनडीए विरुद्ध इंडिया!

शब्दगंध : एनडीए विरुद्ध इंडिया!

देशाच्या राजधानीत ‘एनडीए’ची बैठक तर बंगळुरूत विरोधी पक्षांची बैठक एकाच दिवशी झाली. या बैठकांतून भाजप नेतृत्वातील ‘एनडीए’ आणि काँग्रेसच्या सहभागातून विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन महाआघाड्या साकारल्या आहेत. पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ अशीच होणार यात कोणतीही शंका उरलेली नाही.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर तुल्यबळ आव्हान उभे करण्याचा निर्धार देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेसला सोबत घेऊन सर्व प्रमुख विरोधी पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. बंगळुरूतील बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब झाले. ‘इंडिया’ नावाची महाआघाडी अखेर उदयास आली. ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स’ असे विरोधकांच्या महाआघाडीचे नाव असून त्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेऊन ‘इंडिया’ हा भारताचा अर्थ ध्वनीत करणारा शब्द कल्पकपणे तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

विरोधकांची ‘इंडिया’ महाआघाडी आकारास आल्यावर भाजपलाही आपल्या पंचवीस वर्षे जुन्या ‘एनडीए’ची आठवण झाली. विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून नव्या मित्रपक्षांचा सहभाग असलेली नवी ‘एनडीए’ भाजपने झटपट उभी केली आहे. योगायोग असो की ठरवून, पण देशाच्या राजधानीत ‘एनडीए’ची बैठक तर बंगळुरूत विरोधी पक्षांची बैठक एकाच दिवशी झाली. या बैठकांतून भाजप नेतृत्वातील ‘एनडीए’ आणि काँग्रेसच्या सहभागातून विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन महाआघाड्या साकारल्या आहेत. पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ अशीच होणार यात कोणतीही शंका उरलेली नाही. लोकसभेआधी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी दोन्ही आघाड्यांची कसोटी लागेल.

विखुरलेले विरोधक हेच भाजपच्या आजवरच्या मोठ्या यशाचे गमक ठरले आहे. विरोधकांच्या आपसातील लढण्याने मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला आतापर्यंत मिळत आला आहे. विरोधकांचे कधीच मनोमिलन होणार नाही, अशा भ्रमात भाजप नेतृत्व होते, पण आता देशातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. राजकीय मतभेद, मानभेद, रुसवेफुगवे बाजूला ठेवून सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसचा तिरस्कार करणारे आणि काँग्रेसला कट्टर विरोधक मानणारे तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, डावे असे अनेक पक्ष भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेससोबत एकजुटीने मैदानात उतरले आहेत. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकांत लागोपाठ झालेल्या दोन पराभवांनी भाजप नेतृत्व सावध झाले आहे. विरोधकांच्या मजबूत आघाडीचा सामना स्वबळावर करणे सोपे नसल्याचे त्यांना कळून चुकले आहे. ‘शतप्रतिशत भाजप’ असा नारा देणार्‍या भाजपला ‘एनडीए’ची आठवण त्यामुळेच झाली असेल का?

विरोधकांच्या आघाडीपेक्षा आपल्याकडे जास्त मित्रपक्ष असल्याचे दाखवण्यासाठी अनेक फुटीर गट आणि छोट्या पक्षांना ‘एनडीए’च्या छत्राखाली आणले गेले आहे. ‘भ्रष्टाचारी’ म्हणून विरोधी पक्षांना सतत हिणवण्याचे हत्यार आता बोथट झाले आहे. कारण विरोधी पक्षांतून फुटलेले, भ्रष्टचाराचा ठपका असलेले आणि केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असलेले अनेक नेते व त्यांचे गट भाजपसोबत सत्तेत बसले आहेत. विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांची यथेच्छ खिल्ली उडवण्याचा आनंद घेणारा भाजप पाटण्यातील विरोधी पक्षांच्या महाबैठकीनंतर खडबडून जागा झाला. आपण अजेय आहोत, विरोधी पक्ष आपल्याला पराभूत करू शकत नाहीत, केंद्रसत्तेत पुन्हा येऊन विजयी हॅट्ट्रिक साधायला फारशी अडचण येणार नाही, विखुरलेले विरोधक परस्परविरोधी विचारप्रवाह आणि आपसातील मतभेदांमुळे कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, अशा समजाने भाजपचे प्रमुख कारभारी निर्धास्त होते. मात्र विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीने भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला. काँग्रेससह विविध राज्यांतील प्रभावशाली पक्षांच्या नेत्यांचा बैठकीतील सहभाग पाहून 2024 मधील लोकसभा निवडणूक सोपी नाही याची जाणीव भाजप नेतृत्वाला झाली असावी.

परस्परविरोधी तोंड असलेले आणि एकमेकांवर तुटून पडणारे विरोधी पक्ष आता एकत्र आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून सत्ताबदल घडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, मतभेद, रुसवेफुगवे विसरून एकत्र आले आहेत. सध्या विरोधी पक्ष एकत्र आले तरी पुढे लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून त्यांच्यात पुन्हा खटके उडतील, मतभेद निर्माण होऊन त्यांच्यात पुन्हा फूट पडेल, अशीही आशा भाजप अजूनही बाळगून असेल. तरीही कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सावध होऊन भाजप नेतृत्वाने अल्पावधीत ‘एनडीए’ची नव्याने जुळवाजुळव केली. काही जुन्या आणि बर्‍याच नव्या मित्रपक्षांना सोबत घेऊन एनडीएत प्राण फुंकले आहेत. 38 पक्षांचा समावेश ‘एनडीए’त असल्याचे अभिमानाने सांगितले जात आहे. नव्या ‘एनडीए’त काही जुने पक्ष वगळले तर कधीही चर्चेत नसलेल्या पक्षांची नावे पाहावयास मिळत आहेत. फुटीर आणि बंडखोर गटांच्या नेत्यांना एनडीएत सामावून घेऊन त्यांना ‘मानाचे पान’ देण्याची वेळ भाजपवर आली आहे. एनडीए बैठकीचे निमंत्रण मिळेल, असे स्वप्नातही ज्यांना वाटले नसेल, असे अनेक छोटे पक्षही निमंत्रित होते.

बंगळुरूतील विरोधी पक्षांच्या बैठकीला काँग्रेससह आपापल्या राज्यात दबदबा राखून तेथे भाजपला रोखणार्‍या प्रादेशिक पक्षांचे दिग्गज नेते आवर्जून हजर राहिले. पाटण्यात 15 पक्षांचे नेते हजर होते. बंगळुरूतील बैठकीत ही संख्या 26 वर पोहोचली. विरोधी पक्षांच्या एकजुटीला या बैठकीत खर्‍या अर्थाने आकार मिळाला. आघाडीला सर्वानुमते ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. ‘मोदी इज इंडिया’ असे भाजपवाले नेहमी म्हणतात. मात्र विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिल्याने भाजपतील टीकाकारांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीने बंगळुरूच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वेगवान पावले उचलली आहेत. ‘इंडिया’ची तिसरी निर्णायक बैठक मुंबईत होणार आहे. त्यावेळी विरोधकांच्या आघाडीचे चित्र बरेचसे स्पष्ट होईल. विरोधकांच्या ‘इंडिया’त बरीच मातब्बर नेतेमंडळी सहभागी झाली आहेत. त्यातील अनेक नेत्यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. साहजिक नेता निवडताना आघाडीतील नेत्यांना मोठी कसरत करावी लागेल. अशावेळी ‘इंडिया’चे नेतृत्व कोण करणार? हा कळीचा मुद्दा ठरेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या