नाशिक | रवींद्र केडिया
याकाळात माणसे घरात आहेत. हा बदल अंगवळणी पडायला काही काळ जावा लागला. सुरुवातीला सर्वांचीच घुसमट झाली. पण हळूहळू कुटुंबांमध्ये संवादाचा नवा सेतू तयार होत आहे. ऋणानुबंध घट्ट होत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना परस्परांच्या कामाची, जबाबदारीची, कामकाजातील ताणतणावाची नव्याने जाणीव होत आहे. हा सुखावणारा बदल आहे.
करोना महामारीने सुरुवातीला माणसाला एकाकी केले. सुखदुःखात माणसाच्या जवळ जाण्याचे धारिष्ट्य कुणी करायला धजावत नाही, असे चित्र एका बाजूला आहे. गेले किमान वर्षभर माणसे आपापल्या घरी आहेत. त्यामुळे परस्परांमध्ये विशेष ‘बाँडिंग’ निर्माण होताना दिसत आहे.
कामानिमित्त कुटुंबातील अनेक सदस्य सातत्याने घराबाहेर असल्याचे चित्र आपण अनुभवत आलो आहोत. रोजगाराच्या निमित्ताने माणसे बाहेर पडतात. मुले शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे कौटुंबिक संवादाचे क्षण क्वचितच सर्वांच्या पदरी पडत असतात. करोनाने ते क्षण पुन्हा अनुभवण्याची संधी दिली.
करोनामुळे संपूर्ण जगाचे व्यवहारचक्र थांबले. कामकाज ठप्प झाले. शिक्षण बंद झाले. माणसे घरात बसली. घराबाहेर पडण्यास मुभा नसल्याने सुरुवातीला कुटुंब घरात कोंडल्यासारखे झाले होते. लोकांची घुसमट होत होती. पण जशी परिस्थिती स्थिर झाली आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये जाणते-अजाणतेपणी संवादाने गती घेतली. एकत्रित जेवणे, एकत्रित काम करणे, आवडो न आवडो सुरू असलेला टीव्ही पाहणे यांसारख्या गोष्टी घडू लागल्याने नकळत कुटुंबात जवळीक निर्माण झाल्याचे दिसून येऊ लागले. एकीकडे या महामारीमुळे नातेसंबंध, मित्र परिवार दुरावले जात असतानाच कुटुंबातील भावनिक बंधने मात्र दृढ होताना दिसून आली.
आपण महिलांच्या कामांना अथवा घरातील कामांना दुय्यम स्थान देत आलो आहोत. त्यात काय मोठे?‘ असे म्हणताना त्या कामाचे अजिबात महत्त्व नसल्याचे अधोरेखित करत आलो आहोत. मात्र प्रत्यक्ष जेव्हा आपण कुटुंबाला मदतीचे हात म्हणून पुढे जातो तेव्हा त्या कामातील परिश्रम आणि कसब याची जाणीव होऊ लागते आणि आपोआपच त्यातून परस्पर संबंधातील गोडवा वाढू लागतो. मग कुटुंबातील सदस्यांना जाणवणारे छोटे-मोठे दुखणे असो, स्वयंपाक बनवणे असो, घराची झाडलोट अथवा फारशी पुसणे असो, कपडे धुणे अथवा वाळवणे असो, अशा किरकोळ कामामधूनही परस्परांची काळजी घेतली जात असल्याने निश्चितच ऋणानुबंध घट्ट होताना दिसून येत होते.
सभोवताली पसरलेल्या महामारीच्या काळात कुटुंबाची कशी काळजी घ्यावी, काटकसर कशी करावी, महत्त्वाच्या, कमी महत्त्वाच्या गोष्टी कशा वेगळ्या पाहाव्या याबाबत परस्परांशी संवाद होऊ लागल्याने कामाचा ताणही कमी झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक गोष्ट पैशाने मोजली जायची सवय जडू पाहत होती, मात्र करोना महामारीने प्रत्येकाला पैशाचे महत्त्व पटवून दिले आहे. परावलंबी स्वभावातून स्वावलंबी करण्याकडे वाटचाल दाखवून दिली आहे. वीकेंड साजरा करण्यासाठी विविध हॉटेल्समध्ये जाणार्या मंडळींना स्वयंपाकघरात उभे राहून पदार्थ बनवण्यातून एक नवा आनंद अनुभवायला मिळाला आहे.
काही कुटुंबांनी नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून कुटुंबाला नव्या खाद्यपदार्थांची ओळख करून दिली. यातून निश्चितच नावीन्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून येत होता. यूट्यूबवर नवीन नवीन डिश पाहणे व त्या बनवण्याचा आग्रह धरण्यात कुटुंबही अग्रेसर होऊ लागले आहेत. याकाळात माणसे घरात आहेत. हा बदल अंगवळणी पडायला काहीकाळ जावा लागला. सुरुवातीला सर्वांचीच घुसमट झाली. पण हळूहळू कुटुंबांमध्ये संवादाचा नवा सेतू तयार होत आहे. ऋणानुबंध घट्ट होत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना परस्परांच्या कामाची, जबाबदारीची, कामकाजातील ताणतणावाची नव्याने जाणीव होत आहे. हा सुखावणारा बदल आहे.