Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगशब्दगंध : पोटनिवडणुकीत कोण सरस?

शब्दगंध : पोटनिवडणुकीत कोण सरस?

काँग्रेससह देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी (India Alliance) स्थापन केली असली तरी त्या आघाडीची ताकद कशी समजणार हा प्रश्न होताच. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कृपेने तो प्रश्न चुटकीसरशी सुटला. उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) सहा राज्यांतील सात जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) झाली. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीची पाहिली चाचणी म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले गेले. या चाचणीत ‘इंडिया’ने 4-3 अशा फरकाने यश मिळवले आहे.

काँग्रेससह (Congress) देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली असली तरी त्या आघाडीची ताकद कशी समजणार हा प्रश्न होताच. निवडणूक आयोगाच्या कृपेने तो प्रश्न चुटकीसरशी सुटला. उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथपली, पश्चिम बंगालमधील धुपगुडी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. एनडीए आणि ‘इंडिया’ने त्या चुरशीने लढवल्या. देशाच्या राजधानी दिल्लीत ’जी-20’ शिखर परिषद सुरु असताना विविध राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. 7 पैकी 4 जागा ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी पटकावल्या आहेत. भाजपला 3 जागा जिंकता आल्या. आपापली सत्ता असलेल्या राज्यांत हे सर्व पक्ष जिंकले आहेत.

- Advertisement -

नजीकच्या काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीची पाहिली चाचणी म्हणून या पोटनिवडणुकांकडे पाहिले गेले. 4-3 अशा फरकाने ‘इंडिया’ने त्या चाचणीत यश मिळवले आहे. 4-3 या संख्येतून एनडीएच्या तुलनेत ‘इंडिया’ वरचढ ठरल्याचे दिसते. त्रिपुरा, उत्तराखंड ही भाजपशासित राज्ये आहेत. तेथे भाजपने तीन जागा राखल्या, पण उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठेशी केलेली घोसीची जागा भाजपच्या हातून समाजवादी पक्षाने खेचून आणली. समाजवादी पक्षातून भाजपत गेलेल्या दारासिंह चौहान यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन या जागेवर भाजपकडून नशीब आजमावले, पण त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथांसह त्यांचे मंत्री आणि आमदारांनी जीवाचे रान केले, पण चौहान यांचा, पर्यायाने भाजपचा पराभव झाला. सत्तेसाठी सोयीनुसार पक्षांतर करणार्‍या चौहान यांना मतदारांनी अस्मान दाखवले. केरळमधील पुथपलीची जागा काँग्रेसने जिंकली. धुपगुडीची जागा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपकडून हिरावून घेतली. झारखंडमधील डुमरी मतदारसंघ सत्तारूढ झामुमोने काबीज केला. पोटनिवडणुकीत ‘इंडिया’तील पक्षांची एकजूट दिसली. त्यातून विजय साकारला.

‘जी-20’ शिखर परिषदेनिमित्त्ताने राष्ट्रपतींमार्फत दिली गेलेली निमंत्रणपत्रे ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ नावाने पाठवून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हाच शब्द विदेशी पाहुण्यांपुढे रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधकांच्या आघाडीने ‘इंडिया’ नाव धारण केल्याने ‘भारत’ नाव पुढे आणले जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे, पण मतदारांनी मात्र शाब्दिक वादात न पडता ‘नीरक्षीर’ न्यायाने मतदान केले. त्याचे परिणाम निकालातून देशाला दिसले आहेत. विरोधकांच्या आघाडीने पोटनिवडणुकीत बाजी मारली असली तरी हा मतदारांचा भाजपविरोधी कौल आहे, असे म्हणता येणार नाही, असे काही सरकारप्रेमी वृत्तवाहिन्या आणि माध्यमे सांगत आहेत. त्यासाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी झालेल्या पोटनिवडणुका आणि लोकसभा निवडणूक निकालांचा दाखला दिला गेला आहे. हा मुद्दा मान्य केला तरी घोसीतील निकाल बरेच काही सांगतो.

विरोधकांनी एकजूट दाखवून मतविभागणी टाळल्यास भाजपला पराभवाचा झटका बसू शकतो हे या निकालाने दाखवले आहे. याआधी महाराष्ट्रात कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकून महाविकास आघाडीने त्याची चुणूक दाखवली आहे. घोसी आणि धुपगुडी या दोन्ही जागा भाजपने गमावल्या हे सत्य कसे नाकारणार? 2019 ला पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष विजयी ठरले आणि लोकसभेला भाजप जिंकला असला तरी दरवेळी असेच घडेल असे नाही. मतदारांची मते बदलतात. त्यावेळी विरोधी पक्ष आताच्या इतके एकजूट नव्हते. त्यातून झालेली मतविभागणी अनुकूल ठरली आणि भाजप पुन्हा केंद्रसत्तेत आला. यावेळीही विरोधकांमध्ये दुफळी राहावी, अशीच भाजपची इच्छा असेल, पण आता विरोधक मजबुतीने एकवटले आहेत. कदाचित त्यामुळेच ‘इंडिया’वर सध्या चौफेर हल्ला चढवला जात असावा.

उत्तर प्रदेशात कोणतीही निवडणूक असो वा पोटनिवडणूक; राजकीय पक्षांकडून ती चुरशीने लढवली जाते. घोसी पोटनिवडणूक त्याला अपवाद नव्हती. ही जागा जिंकून समाजवादी पक्षाने भाजपला तगडा झटका दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष असेल. ‘इंडिया’ची भारतभर चर्चा सुरू असताना ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच झाली आहे, आम्ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत, असे सांगून आघाडीतील काही पक्षांचे नेते आघाडीला अपशकून करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीच्या ऐक्याला ते मारक ठरू शकते. आघाडीची ताकद खरोखर आजमवायची असेल तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ची एकजूट दिसायला हवी.

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला चांगला जनाधार आहे. तेथे काँगेसच्या पाठीशी एकजुटीचे बळ उभे केल्यास तिन्ही राज्यांत ‘इंडिया’ची विजयपताका फडकवणे अवघड नाही. लोकसभा निवडणुकीआधी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेसाठी मनोबल उंचवता येईल. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ हे घोषवाक्य किती सत्यात उतरते ते सर्वस्वी आघाडीतील प्रत्येक पक्षावर अवलंबून असेल. घोसीसह 7 जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल देशात बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत देत असल्याचा दावा ‘इंडिया’च्या नेत्यांकडून केला जात आहे. तथापि त्याची खरी प्रचिती विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील जनमताचा कौलच देऊ शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या