मुंबई | Mumbai
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही. पठाण या चित्रपटाने चार दिवसात बक्कळ कमाई केली आहे.
हा चित्रपट बुधवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. पण चौथ्या दिवशी म्हणजेच काल मात्र या चित्रपटाने पुन्हा एकदा चांगली कमाई केली आहे.
शनिवारी असलेल्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काल या चित्रपटाने एकूण ५५ कोटींचा गल्ला जमवला. चार दिवसांची आकडेवारी मिळवता या चित्रपटाने आतापर्यंत देशभरातून एकूण २२१.७५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
शाहरुख खानचा पठाण हा हिंदीत ४ दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. यासोबतच या चित्रपटाने बाहुबली आणि KGF Chapter 2 सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. प्रभासचा बाहुबली २ देखील ४ दिवसात जगभरात ४०० कोटी कमवू शकला नाही. पण शाहरुख खानच्या पठाणने हे करुन दाखवलं आहे. चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर १००० कोटींचा आकडा दूर नाही.