मुंबई | Mumbai
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त केलेले ५ कोटी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. काय बापू, किती हे खोके? अशी पोस्ट राऊत यांनी सोशल मीडियावर केली. त्यांच्या आरोपानंतर शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हाणाले शहाजी बापू पाटील?
संजय राऊत यांच्या आरोपानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “ती गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबातील कुणाची नाही. नेमके काय झालेय हे मला माहीत नाही. संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडे दिसतेय तर सकाळी उठल्यावर डोंगर दिसतोय, मला बदनाम करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. त्या गाडीशी माझा काही संबंध नाही,” असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
सोमवारी रात्री तपासणीदरम्यान, खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीत सोमवारी रात्री ५ कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही गाडी एका शिंदे गटाच्या आमदाराच्या जवळच्या व्यक्तीची असल्याची चर्चा सुरु झाली होती. चौकशी दरम्यान ही कार अमोल शहाजीराव नलावडे यांच्या मालकीची असून ही गाडी एका बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारमधून चारजण ही पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात होते. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी सापडले! (प्रत्यक्षात ५ कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू… किती हे खोके?”, अशी पोस्ट संजय राऊतांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा