मुंबई | Mumbai
अभिनेता सलमान खानला मागील काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खाननंतर अभिनेता शाहरूख खानला देखील धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकी प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी धमकीचा फोन आला होता, यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला असून पुढील तपास सुरु आहे.
शाहरुखच्या धमकी प्रकरणात छत्तीसगड रायपूर कनेक्शन आढळून आले आहे. तिथे राहणाऱ्या फैझान नावाच्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला होता. मुंबई पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी रायपूरला गेली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहरुख खान भोवती कडक सुरक्षा व्यवस्था आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस स्थानकात शाहरूख खानच्या नावाने धमकीचा फोन आला होता. शाहरूख खानचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला कोटी रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. असे न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन फोन कट करण्यात आला. पोलिसांनी निवावी फोन करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते रायपुर येथील असल्याचे समोर आले.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351(3)(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कसून तपास सुरु असून आरोपींना लवकरच पकडले जाईल, असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सलमान खानला बिश्नोई गँगकडून येत असलेल्या धमक्यानंतर शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शाहरूख खानला आलेल्या धमकीनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात सलमानचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. आता पुन्हा एकदा वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा