नाशिक | प्रतिनिधी
नाशिकरोड पोलीस ठाण्यात शालार्थ आयडी घोटाळ्याचा गुन्हा दाखल असून, त्यातील फिर्यादी व तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हा आहे. तपासाअंती चव्हाण हाच या घोटाळ्यात संशयित आढळला असून, त्याच्या अटकेची कार्यवाही नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. त्याच्यावर नाशिक व मालेगावात दोन गुन्हे नोंद असल्याने अखेर शिक्षण व क्रीडा विभागाने त्याला निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शालार्थ घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी याला अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान, या गुन्ह्याचा फिर्यादीच मुख्य संशयित असल्याचे स्पष्ट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिकचा तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलिसांत शालार्थ घोटाळ्याचा गुन्हा नोंद आहे. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह शालेय पदाधिकाऱ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिकांसोबत संगनमत करून बनावट शालार्थ आयडी बनवल्याचा हा गुन्हा आहे.
मात्र, या गुन्ह्यात फिर्यादी चव्हाण हाच गुन्ह्यातील मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगून उपासनीसह त्याचे नाव संशयितांत स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे सध्या अमरावती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा विभागीय सचिव पदावरुन निलंबित केलेल्या चव्हाणवर अटकेची टांगती तलवार असून, अटक झाल्यावर अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
ग्रामीणची एसआयटी करणार तपास
वरील गुन्ह्यासह मालेगावातही बोगस शिक्षक भरती केल्यासंदर्भाने उपासनीसह चव्हाणवर गुन्हा नोंद आहे. त्यानुसार, आता ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने शालार्थ व बोगस भरतीसंदर्भाने दाखल सर्वच गुन्ह्यांच्या तपासासाठी ग्रामीण आर्थिक गुन्हे `शाखेत ‘एसआयटी स्थापन आहे. ही एसआयटी पुढील काही दिवसांत उपासनीचा ताबा घेऊ शकते. तसेच, चव्हाणचाही ताबा मिळवणार आहे. न्यायालयाच्या आदेशाने उपासनी सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. तर, भाऊसाहेब चव्हाण यानेही अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. दोन्ही अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल शालार्थ घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासाला पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत वेग आला आहे. याप्रकरणात अंमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील (वय ६५) यांनाही अटक केली होती. त्यापैकी मनोज व दत्तात्रय हे शिक्षण संस्थाचालक असून, नीलेश हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामदास शेळके यासंदर्भात विस्तृत तपास करीत आहेत. गुन्ह्यात नाशिकरोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यालाही सहसंशयित आहे. त्याचेही निलंबन झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




