मुंबई | Mumbai
दिल्लीतल्या साहित्य संमेलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत पुरस्कार दिला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कौतूक देखील केले. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना खडेबोल सुनावले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत. त्यांना आपल्या हातून अशा प्रकारे सन्मान देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली. आता यावरून शिंदे सेनेकडून संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत.’, अशी टीका शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी केली.
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे, ‘संजय राऊत वैफल्याच्या भूमिकेत आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कालचा सत्कार राष्ट्रीय पुरस्कार महादजी शिंदे स्मृती पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती महाराष्ट्राचे सुपुत्र आणि पुरस्कार देणारे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा दुसऱ्या थोर सुपुत्राच्या हस्ते होणारा सत्कार हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. अशा गोष्टीकडे चांगल्या अर्थाने पाहण्यापेक्षा पवारसाहेबांनी तो पुरस्कार द्यायला नव्हता होता अशी भूमिका संजय राऊत घेत असतील तर राऊत म्हणतील तर चांगले आणि राऊतांच्या भूमिकेपेक्षा वेगळे काही झाले तर ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना त्यांचे स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालावले आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त भावनेतून ते असे वक्तव्य करत आहेत.’
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरून शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितले होते की, ‘एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवार यांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने फोडली. महाराष्ट्र कमजोर केला आशा लोकांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील.’
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली असून ते म्हणाले, शिंदे साहेबांचा दिल्लीत सत्कार झाला. स्वतःचा सत्कार होऊ शकत नाही, हे काही लोकांचे दुःख आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना, शरद पवार साहेबांना बदनाम करायचे. मराठी साहित्य संमेलनात कुठेही पक्षाचे राजकारण नाही. शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून तिथे आहे. त्यामुळे उगाचच एखाद्या गोष्टीचे भांडवल करु नये, असे मंत्री सामंत म्हणाले. सत्कार कोणी केला यापेक्षा ठाकरे गटाचा पोटशूळ हा एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला हा आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत स्वतःला शरद पवारांपेक्षाही मोठे समजायला लागले आहेत. शरद पवारांनी काय करावे, काय करु नये, हे देखील ते सांगायला लागले आहेत का? असा सवाल खासदार म्हस्केंनी उपस्थित केला. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. ज्या आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत, ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांच्यावरच राऊत टीका करत आहेत. त्यांना एवढच वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असेही खासदार म्हस्के म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा