Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : शनिशिंगणापूर अ‍ॅप घोटाळा; देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या खात्यात 1 कोटीची उलाढाल

Ahilyanagar : शनिशिंगणापूर अ‍ॅप घोटाळा; देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या खात्यात 1 कोटीची उलाढाल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या बनावट अ‍ॅप प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल एक कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम अधिकृत परवानगी असलेल्या आणि बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या रकमेचा पुढील प्रवास नेमका कुठे झाला, कोणकोणाच्या खात्यात गेली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी (30 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी उपस्थित होते. अ‍ॅप घोटाळ्यात दर्शन, अभिषेक व इतर सेवांसाठी भाविकांकडून 500 ते 5 हजार रूपयांपर्यंत रकमा आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रक्कम तुलनेने लहान असल्याने कोणीही थेट फिर्याद दिली नव्हती, मात्र हजारो भाविकांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली गेल्याने एकूण घोटाळ्याची रक्कम प्रचंड मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होत तपास सुरू केला.

YouTube video player

देवस्थानकडून फक्त तीन अ‍ॅप्सना अधिकृत परवानगी देण्यात आली होती. परंतु तपासात चार अनधिकृत अ‍ॅप्स कार्यरत असल्याचे समोर आले असून, आणखी अ‍ॅप्स कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप्स देशभरातील अन्य देवस्थानांनाही लिंक केले गेले असल्याची माहितीही उघड झाली आहे. या घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या माध्यमातून देवस्थानच्या अधिकृत खात्यावर रक्कम जमा झाल्याचे पुरावे सध्या तरी उपलब्ध नाहीत.

ज्या अ‍ॅप्सना परवानगी होती, त्यांच्याव्दारे देवस्थानला नक्की किती आर्थिक लाभ झाला, याची चौकशी सुरू आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावून माहिती मागवण्यात आली. मात्र, अद्याप त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. तपास तांत्रिक स्वरूपाचा असून अनेक गोष्टींची पडताळणी आवश्यक असल्याने अद्याप कोणालाही गुन्ह्यात आरोपी ठरवलेले नाही, आत्महत्या केलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांना चौकशीसाठी कधीही बोलावण्यात आले नव्हते, असेही अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.

प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावाचा वापर
या प्रकरणात काही अ‍ॅप्स प्रतिष्ठित कंपन्यांचे असल्याचे भासवले जात होते, ज्यामार्फत अयोध्या, वैष्णवदेवी यासारख्या प्रसिध्द तीर्थक्षेत्रांवरही सेवा दिल्या जातात. मात्र, अशा कंपन्यांचे देवस्थानांशी नेमके कोणत्या स्वरूपाचे करार होते, हे स्पष्ट व्हायचे आहे. विविध देवस्थानांशी पत्रव्यवहार करून माहिती मागवण्याचे काम सध्या सुरू आहे, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...