शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur
श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी आलेल्या पिठोरी अमावस्येमुळे शनिशिंगणापुरात गर्दीचा महापूर दिसून आला. सुमारे 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी पंचक्रोशीतील व राज्यातील भाविकांचा जनसागर उसळला. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर शेवगाचे पोलीस उपाध्यक्ष गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूरचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी वाहतूक सुरळीत ठेवल्याने कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.
पहाटेची आरती सौरव बोरा व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाली. दुपारची आरती किशोरजी यांचे हस्ते तर सायंकाळची आरती माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले व शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बनकर यांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार अण्णासाहेब माने व पद्मश्री पोपटराव पवार यांनी दर्शन घेतले.
भंडाराच्यारूपाने ठिकठिकाणी अन्नदानाचे प्रसाद वाटप करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे, विश्वस्त दीपक दरंदले, प्रा. शिवाजीराव दरंदले, सयाराम बानकर, यांनी अतिथीचे स्वागत केले. आमदार शिवाजीराव कर्डिले व अक्षय कर्डिले यांच्यातर्फे शनिशिंगणापूरमध्ये खिचडीचे वाटप करण्यात आले.




