सोनई |वार्ताहर| Sonai
शिंगणापूर देवस्थान हे राज्यातील अनेक देवस्थानपेक्षा आर्थिकदृष्ट्या खूप छोटे आहे परंतु तेथे सगळ्याच पक्षाकडून चालू असलेले राजकारण हे खूप मोठे आहे. राज्यातील एक गुणवान व लोकांसाठी काम करत असलेले विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची ख्याती आहे असा चांगला अधिकारी देवस्थानचा कारभारी झाल्याने देशातील भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
फपुणे, जळगाव, धाराशिव अशा ठिकाणी डॉ प्रवीण गेडाम यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. एक चांगला कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून राज्यात त्यांचा नाव लौकिक आहे. शुक्रवारी (दि 19 डिसेंबर) रोजी दुपारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच डॉ. गेडाम यांनी शनीशिंगणापूर मंदीरात येऊन शनि दर्शन घेऊन विश्वस्तांकडून पदभार स्वीकारला. शनिअमावास्या असल्याने त्यांनी रात्री मंदिरातच मुक्काम केला व गर्दीच्या नियोजनासाठी सूचना केल्या. पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांनी लक्ष ठेवले व सकाळी 9 वाजता देवस्थानच्या सुमारे 30 विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी विभाग प्रमुखांची धांदल उडाली.
आपल्या घरचे काम जसे करतो त्याच प्रामाणिकपणे तुम्हाला देवस्थानचे काम करावे लागेल, अनियमितता, भ्रष्टाचार अशा चुकीच्या गोष्टी घडल्यास कुणाचीही हयगय करणार नाही अशा कडक शब्दात विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. शनी भक्त श्रद्धेने या ठिकाणी दान देतात त्यामुळे देवस्थानचे हित व भाविकांना सुविधा यावर लक्ष ठेवा असेही डॉ गेडाम यांनी सांगितले. शनीवारी मंदिर परिसर, देवस्थानचे रुग्णालय, बर्फी तयार करण्याचे ठिकाण, गो शाळा अशा सर्व जागेवर जात पाहणी केली. शनी शिंगणापूर मंदिरात सगळ्याच पक्षाकडून राजकारण केले जाते यापूर्वी राजकारणासाठी अनेक गोष्टी घडल्या आहे अगदी देवाच्या डोक्यावर हाथ ठेऊन राजकारणातील शपथेचा कार्यक्रम झाला आहे.
साडेसाती गेली
कलम 2018 च्या नियमानुसार नवीन विश्वस्त मंडळ येण्यासाठी नियमावली तयार करून अधिवेशनात दोन्ही सभागृहाची मान्यता घ्यावी लागणार असल्याने किमान 4 महिने नवीन विश्वस्त नेमता येणार नाही त्यामुळे राजकीय नेत्यांची साडेसाती गेली अशी चर्चा होत आहे.
विभागीय आयुक्त व साधेपणा
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी रात्री मंदिर परिसरातच मुक्काम केला. एवढा मोठा अधिकारी असताना सुद्धा कुठलाही बडेजावपणा केला नाही. अगदी दर्शनाला जाताना अधिकारी व सुरक्षा रक्षकांना सांगितले की मी एकटा जाऊन दर्शन घेतो. त्यांच्या या कृतीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.





