शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur
शनिशिंगणापूर येथील कुर्हाट पार्किंग येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कमिशन एजंटांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एक एजंट व एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेमुळे शनिशिंगणापूरला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत.
येथे तणावपूर्ण शांतता असून नगर येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी कमिशन एजंटासाठी शनिशिंगणापूर बंद ठेवण्यात आले होते. यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठविला होता. मात्र, लटकुंवर आत्तापर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नव्हती. पोलीस ठाण्यासमोरच लटकू भाविकांच्या वाहनांना अडवताना आढळतात. असे असून देखील पोलीस उघड्या डोळ्यांनी बघ्याची भूमिका घेत आहेत.
त्यामुळे गावकर्यांनी ठराव करून सुद्धा यावर काही कारवाई झाली नाही. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लटकुंचा प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेवर पीआय खगेंद्र टेंभेकर हे लक्ष ठेवून आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.