शनीशिंगणापूर |वार्ताहर|Shanishinganapur
शनीशिंगणापूर येथे शनीअमावास्येनिमित्त सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. सर्वपित्री अमावास्या, मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातील सभा तसेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना याचा कालच्या यात्रेवर प्रभाव पडल्याचे दिसून आले. त्यामुळे दरवेळी शनीअमावास्येला होणार्या गर्दीच्या तुलनेत यावेळी गर्दी कमी होती.
सकाळी भाविकाची गर्दी झाली होती. दर्शन रांगेत शनिदर्शनसाठी रांगा होत्या. राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता दुतर्फी चालू असायचा तो मार्गही जेमतेम दिसून आला होता. दिवसभर शनी भक्त शनी देवाच्या चरणी लीन झाले. या वेळी देवस्थान समितीच्या वतीने येणार्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते.
शनिचौथरा विविध फुलांनी सजवला होता. दर्शन रांगेत शनिदेवाचा जय जयकार केला जात होता. प्रवेश द्वारासह आकर्षक अशी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भाविकांनी घेतला भंडार्याचा लाभ
दोन दिवसापासून दिल्ली, हरियाणा, मधील भविकांचा भंडारा चालू असल्यामुळे शनिप्रसादाचा नेहमीप्रमाणे लाभ घेतला. विशेष अतिथीचे स्वागत अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, पोलीस पाटील सयाराम बानकर, बाळासाहेब बोरुड़े, दीपक दरंदले यांच्यासह देवस्थाचे विश्वस्त करत होते.
यात्रा कमी भरल्याचे जाणवल.देवस्थानकड़े येणार्या जाणार्या वाहनाची पार्किंग नियोजन 2/3 किलोमीटरवर केल्याने भाविकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देवस्थान ते संभाजीनगर रस्त्याला जोड़णारा रस्ता एक दिवस थातुरमातूर मुरमाने मोठे पड़लेले खड्डे बुजवून टाकले खरे, तो रस्ता काही दिवसानी जैसे थे राहणार असून दर्जेदार खड्डे बुजवून देवस्थानने दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया अ़ॅड. प्रफुल जाधव यांनी दिली.
मुळा कारखाना, कांगोणी, संभाजीनगर, हनुमानवाड़ी, घोड़ेगाव रोड, पानसनाला आदी मार्गावर भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था केली होती.
पहाटेची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे व दुपारची आरती झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा यांनी केली. सायंकाळची आरती पुणे येथील डेंटल विद्यालयाचे सदस्य श्री. हेडगेवार यांच्या हस्ते झाली.
आ. राहुल जगताप, जिल्हा सहकारी बैंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बदनापूरचे भाजपाचे आमदार नारायण कुचे, मुळा एज्यूकेशनचे उपाध्यक्ष उदय गडाख, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी दर्शन घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्ताकरता एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एक पोलीस उपाधीक्षक, पाच पोलीस निरीक्षक व 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच 150 पोलीस कर्मचारी हजर होते. दरम्यान वाहतुकीस अडथळा करणार्या तीन लटकूंवर कारवाई करण्यात आली. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्या दोन वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन निधीतून देवस्थानला पाच कोटी
शनीशिंगणापूरला भविकांचा वाढता ओघ लक्षात घेता अचानक होणार्या आपातकालीन परिस्थितीत भाविकासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ 5 कोटी देण्यात येतील असे आश्वासन राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयात दिले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फ़त पाठवावा, असा आदेश नेवासा तहसीलदार यांना देण्यात आला.